बीड: संतोष देशमुख हत्या प्रकरणावर आज कोर्टात सुनावणी पार पडली. सर्वच आरोपींनी दोष मुक्तीसाठी अर्ज सादर केला होता. यावर एक एक आरोपी दोषमुक्तीसाठी अर्ज करेल आणि सुनावणी लांबणीवर जाईल. त्यामुळे लवकरात लवकर निर्णय द्यावा अशी मागणी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केली आहे. आता पुढील सुनावणी 4 ऑगस्टला होणार आहे.
संतोष देशमुख हत्याप्रकरणी आज बीडमधील सत्र न्यायालयात सुनावणी झाली. गेल्या सुनावणीवेळी वाल्मिक कराडची संपत्ती जप्त करण्याबाबतच्या अर्जावर युक्तिवाद करण्यात आला होता. तर त्याआधीच्या सुनावणीमध्ये दोष मुक्तीच्या अर्जावर युक्तिवाद झाला होता. दरम्यान वाल्मिक कराडचा दोष मुक्तीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला असल्याचे सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितले.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडसह इतर आरोपींनी दोषमुक्तीसाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. दोषमुक्तीसाठी अर्ज दाखल करुन वेळेचा अपव्यय करायचा, हा त्यांचा विचार आहे. विष्णू चाटेपासून उर्वरित आरोपींनी देखील दोषमुक्तीसाठी अर्ज दाखल केला. आम्ही त्याबाबत बाजू मांडली असे निकम यांनी म्हटले. तसेच वाल्मिक कराडने जामीनासाठी अर्ज केला. वाल्मिक कराडसह इतर साथीदारांवरही इतर आरोप दाखल करावे. त्यानंतर खटल्याला सुरुवात होईल असेही त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा: Manikrao Kokate: माझी नाहक बदनामी केली, त्यांना कोर्टात खेचणार; कोकाटेंनी दिला इशारा
पुढे बोलताना, दोन महिन्यात दोष मुक्तीचा आरोप अर्ज करायला हवा होता. आरोपींच्या दोष मुक्तीच्या अर्जावर आता 4 ऑगस्ट रोजी सुनावणी होईल. तसेच वाल्मिक कराडच्या संपत्ती अर्जावर निर्णय राखून ठेवला आहे. या खटल्यावर तातडीने सुनावणी होईल असेही वकील निकम यांनी सांगितले.
'आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी'
दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केली आहे. तसेच शिष्टमंडळात जे गावकरी आहेत, त्यांच्यात एक बैठक होईल. त्या बैठकीत जो निर्णय होईल. त्यानुसार पुढील लढा कसा द्यायचा हे ठरेल. त्या पद्धतीने आम्ही लढणार आहोत असेही धनंजय देशमुख यांनी सांगितले.