नवी दिल्ली: प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती राष्ट्रपती कोट्यातून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यादरम्यान, उज्ज्वल निकम यांच्याबरोबरच भारताचे माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला, शिक्षणतज्ज्ञ सी सदानंदन मास्ते, शिक्षणतज्ज्ञ मीनाक्षी जैन यांचीही राष्ट्रपती नामनिर्देशित सदस्य म्हणून म्हणून राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान, 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या कसाबला मृत्युदंडाची शिक्षा मिळवून देण्यात वकील उज्ज्वल निकम यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यासोबतच, उज्ज्वल निकम हे सरकारी वकील म्हणून काम करत होते. त्यामुळे आता उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती पदाच्या नामनिर्देशित खासदार म्हणून राज्यसभेवर नियुक्ती झाली आहे. राष्ट्रपतींनी त्यांच्या विशेष अधिकारांचा वापर करून उज्वल निकम यांच्यासह माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला, शिक्षणतज्ज्ञ सी सदानंदन मास्ते, शिक्षणतज्ज्ञ मीनाक्षी जैन यांची राज्यसभेवर नियुक्ती केली आहे. दरम्यान, पूर्वी नामनिर्देशित सदस्यांच्या निवृत्तीमुळे तसेच जागा रिक्त झाल्याने राष्ट्रपतींनी चार नावे सुचवली आहेत. आता त्या जागांवर हर्षवर्धन श्रृंगला, सी सदानंदन मास्ते, मीनाक्षी जैन आणि उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
हेही वाचा: जे आडवं येईल त्याला उचला, त्याशिवाय हे होणार नाही; अजितदादांचा स्पष्ट निर्देश
उज्ज्वल निकमांची पहिली प्रतिक्रिया
नामनिर्देशित खासदार म्हणून निवड झाल्यानंतर प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम म्हणाले की, 'राज्यसभेत राष्ट्रपतींकडून नियुक्ती म्हणजे कायदा क्षेत्रात केलेल्या कामाचे फळ आहे. माझा कायद्याचा अभ्यास देशाच्या ऐक्याकरीता तसेच देशातील लोकशाही आणि संविधान प्रबळ राहील यासाठी प्रयत्न करीन'. यासोबतच, उज्वल निकम यांनी खासदार म्हणून नियुक्ती केल्याबद्दल राष्ट्रपती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही आभार मानले.
तसेच, माध्यमांशी बोलताना उज्वल निकम म्हणाले की, 'काल पंतप्रदान मोदींचा 8 वाजून 44 मिनिटांनी फोन आला होता. त्यांनी पहिला प्रश्न मराठीत विचारला; म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत. यावर मी म्हटलं आपलं दोन्ही भाषेवर प्रभूत्व आहे. कोणत्याही भाषेत बोलू शकता. यावर मोदींनी मराठीत संभाषण केले. ते म्हणाले, "राष्ट्रपती आपल्यावर मोठी जबाबदारी देणार आहेत. ती देशासाठी चांगली सांभाळाल यासाठी शुभेच्छा देतो'.