नागपूर: नागपूर शहरातील वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने एका पत्नीने प्रियकराच्या मदतीने अर्धांगवायूग्रस्त पतीचा नाक-तोंड दाबून खून केला. या प्रकरणात सुरुवातीला नैसर्गिक मृत्यूचा बनाव करण्यात आला होता. मात्र शवविच्छेदन अहवालात सत्य समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे.
ही घटना 4 जुलै रोजी उघडकीस आली. मृत व्यक्तीचे नाव चंद्रसेन असून त्यांचा विवाह 13 वर्षांपूर्वी दिशा रामटेकेसोबत झाला होता. त्यांना दोन मुली आणि एक सहा वर्षांचा मुलगा आहे. काही वर्षांपूर्वी चंद्रसेन यांना अर्धांगवायूचा झटका आल्यामुळे ते पूर्णवेळ घरीच राहत होते. घरखर्च भागविण्यासाठी दिशा पाण्याचे कॅन भरून विक्रीचा व्यवसाय करत होती. याच दरम्यान तिची ओळख आसिफ इस्लाम अन्सारी उर्फ राजाबाबू टायरवाला या व्यक्तीशी झाली. तो दुचाकी दुरुस्ती आणि पंचर काढण्याचं काम करत होता. हळूहळू या ओळखीचं रूपांतर प्रेमसंबंधात झालं.
हेही वाचा: 8 व 9 जुलैला राज्यातील शाळा बंद; नेमकं कारण काय? जाणून घ्या
चंद्रसेन यांना या संबंधाचा संशय आल्यामुळे ते दिशाला वारंवार टोमणे मारत, शिवीगाळ करत होते. त्यामुळे दिशाने पतीला संपविण्याचा कट रचला. घटनेच्या दिवशी दिशाने प्रियकर आसिफ अन्सारीच्या मदतीने पती चंद्रसेनच्या नाका आणि तोंडावर उशी ठेवून गळा दाबला आणि त्याचा खून केला.
सुरुवातीला हा मृत्यू नैसर्गिक असल्याचं सांगण्यात आलं. मात्र शवविच्छेदन अहवालात गळा, नाक आणि तोंड दाबल्यामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांच्या संशयाला बळकटी मिळाली. अखेर तपासात दिशा आणि तिचा प्रियकर आसिफ अन्सारी यांनी खून केल्याचं उघड झालं. पोलिसांनी दोघांनाही अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.