Chandra Barot passes away
Edited Image
मुंबई: ‘डॉन’ या अमिताभ बच्चन यांच्या सुपरहिट चित्रपटाचे दिग्दर्शक चंद्रा बारोट यांचे रविवारी मुंबईत निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. गेल्या अनेक वर्षांपासून फुफ्फुसांच्या आजाराने त्रस्त असलेल्या बारोट यांची प्रकृती अलीकडेच खालावली होती. त्यानंतर त्यांना गुरुनानक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जिथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पत्नी दीपा बारोट यांनी टाइम्स ऑफ इंडियाला माहिती देताना सांगितले की, 'ते गेल्या सात वर्षांपासून फुफ्फुसांच्या फायब्रोसिस या आजाराने त्रस्त होते.'
‘डॉन’मधून लाभलेली विशेष ओळख
टांझानियाहून भारतात आलेल्या चंद्रा बारोट यांनी आपल्या फिल्मी प्रवासाची सुरुवात अभिनेता-निर्माते मनोज कुमार यांच्यासोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यांनी ‘पूरब और पश्चिम’, ‘शोर’ आणि ‘रोटी कपडा और मकान’ यांसारख्या चित्रपटांत काम केले. परंतु, त्यांना खरी ओळख 1978 साली दिग्दर्शित केलेल्या ‘डॉन’ चित्रपटातून मिळाली. हा चित्रपट आजही हिंदी सिनेमातील कल्ट क्लासिक मानला जातो. यशाच्या शिखरावर पोहोचलेला ‘डॉन’ चित्रपटच बिग बी साठीही टर्निंग पॉईंट ठरला.
चंद्रा बारोट यांनी ‘आश्रिता’ आणि ‘प्यार भरा दिल’ हे चित्रपट दिग्दर्शित केले. परंतु, त्यांना ‘डॉन’सारखे यश मात्र पुन्हा मिळवता आले नाही. त्यामुळे त्यांना 'वन-हिट वंडर' म्हणूनही ओळखले गेले. चंद्रा बारोट यांच्या निधनावर बॉलिवूडमधूनही शोक व्यक्त केला जात आहे. फरहान अख्तर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिले,
'ओरिजिनल डॉन’ चे दिग्दर्शक आता आपल्यात नाहीत, हे ऐकून फार दुःख झाले. चंद्रा बारोट जी यांच्या आत्म्याला शांती लाभो. त्यांच्या कुटुंबाप्रती माझ्या संवेदना.'
चंद्रा बारोट यांनी काही मोजकेच चित्रपट दिग्दर्शित केले असले तरी ‘डॉन’ सारख्या एका चित्रपटानेच त्यांची ओळख अजरामर केली. हिंदी चित्रपटसृष्टीने आज एक असे व्यक्तिमत्त्व गमावले आहे, ज्यांच्या एका चित्रपटाने अनेकांच्या मनात कायमची जागा मिळवली.