मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच आपल्या अभिनयासोबत स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने महिलांसाठी मोलाचा सल्ला दिला आहे. “महिला करू शकत नाही अशी एकही गोष्ट नाही! वय, संसार किंवा जबाबदाऱ्या या गोष्टी कधीच अडथळा ठरू नयेत,” असा प्राजक्ताचा ठाम विश्वास आहे.
महिला ‘अष्टावधानी’ असतात – प्राजक्ता माळी
प्राजक्ताने सुमन मराठी म्युझिक या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत तिच्या विचारांचे स्पष्टपणे समर्थन केले. ती म्हणाली, “जर तुमच्या मनात एखादी गोष्ट करण्याची तीव्र इच्छा असेल, तर ती नक्कीच पूर्ण करा. मार्ग निघतील, मार्ग काढा!” महिलांमध्ये एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या पेलण्याची क्षमता असते, म्हणूनच त्या ‘अष्टावधानी’ असतात.
हेही वाचा : त्र्यंबकेश्वर मंदिरात होणारा प्राजक्ता माळीचा कार्यक्रम अडचणीत
स्वप्नांना वयाची अडचण नसते!
तिने महिलांना प्रेरित करत सांगितले, “वय, संसार, जबाबदाऱ्या या गोष्टी बाजूला ठेवा. कारण, तुम्ही तुमची स्वप्ने कधीही पूर्ण करू शकता. तब्येत महत्त्वाची असते, पण ती व्यवस्थित ठेवली, तर पन्नाशीतही नवीन काहीतरी सुरू करणे सहज शक्य आहे आणि करायलाच हवे!”
हेही वाचा : दृश्यम ३ चा ट्रेलर रिलिज. 'हा' अभिनेता झळकणार मुख्य भूमिकेत
आर्थिक स्वावलंबन महत्त्वाचे!
महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहणे गरजेचे असल्याचेही तिने सांगितले. ती म्हणाली, “जेव्हा तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम होता, तेव्हा तुम्हाला घरात आपसूकच आदर मिळतो. तुम्ही दुसऱ्यावर कमी अवलंबून राहता, आणि तेच तुमच्या आत्मविश्वासासाठी खूप महत्त्वाचे असते.”