मुंबई: नुकताच, बॉलीवूड अभिनेता इमरान हाश्मीच्या आगामी चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. या चित्रपटाचे नाव 'ग्राउंड झिरो' आहे. इमरान हाश्मीचा आगामी चित्रपट 'ग्राउंड झिरो' सत्य घटनेवर आधारित आहे. 2001 मध्ये काश्मीर येथे घडलेली एक घटना या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात, इमरान हाश्मी मुख्य भूमिकेत असून यामध्ये त्याने लष्करी अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. या टीझरची सुरुवात एका अशांत वातावरणापासून होते. एक लष्करी अधिकारी भरदिवसा 1 नाही 2 नाही तर तब्बल 70 सैनिकांना गोळ्या घालून ठार मारतो. त्यानंतर रेकॉर्ड केलेल्या आवाजामध्ये एक दहशतवाद्यी म्हणतो, 'भारताचे मंत्री-ए-आलम, ऐक... काश्मीरचे स्वातंत्र्य, एकच उद्देश. मोहम्मद न्याय देईल'.
त्यानंतर, इमरान हाश्मी एका मिशनला जातो. मात्र, शेवटी तो एका बॉम्बस्फोटामध्ये जखमी होतो. तेव्हा इमरान हाश्मी एक जबरदस्त डायलॉग म्हणतो, 'फक्त काश्मीरचीच भूमी आपली आहे किंवा इथले लोकही?' असा प्रश्न सर्वांसमोर उपस्थित करतो.
इमरान हाश्मी लष्करी अधिकाऱ्याच्या भूमिकेत:
या चित्रपटात, मागील 50 वर्षांतील 'बीएसएफ (BSF)' यांचे सर्वात मोठे मिशन दाखवले आहे. यामध्ये इमरान हाश्मी, बीएसएफ डेप्युटी कमांडर नरेंद्र नाथ दुबे यांची भूमिका साकारत आहे. आतापर्यंत इमरानने रोमँटिक हिरोची भूमिका साकारली आहे. मात्र, आता इमरान हाश्मी लष्करी अधिकाऱ्याच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.
आगामी ग्राउंड झिरो चित्रपटात पाहायला मिळेल 'ही' मराठमोळी अभिनेत्री:
या चित्रपटात, इमरान हाश्मीसोबत मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरदेखील पाहायला मिळणार आहे. या बहुचर्चित चित्रपटामध्ये, सई ताम्हणकर महत्त्वाच्या भूमिकेत आहे.
चित्रपटातील महत्वाच्या भूमिका:
या चित्रपटाचे दिग्दर्शन तेजस देओस्कर यांनी केलं आहे. त्यासोबतच, या चित्रपटात झोया हुसेन, मुकेश तिवारी, दीपक परमेश, ललित प्रभाकर, रॉकी रैना आणि राहुल वोहरा महत्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची निर्मिती धुरा कासिम जगमगिया, विशाल रामचंदानी, संदीप सी सिधवानी, अर्हाना बगाती, टॅलिसमॅन फिल्म्स, अभिषेक कुमार व निशिकांत रॉय यांनी केली आहे. हा चित्रपट 25 एप्रिल 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे.