Thursday, August 21, 2025 04:56:38 AM

‘आम्हाला शिव्या द्या, हिंदूंना का?’ जावेद अख्तर यांचा पाक लष्करप्रमुख असीम मुनीरवर संताप

जावेद अख्तर यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्या हिंदूंविषयीच्या वक्तव्यावर टीका केली. 'पाकिस्तानी हिंदूंनाही विचारात घ्या,' असा स्पष्ट संदेश दिला.

‘आम्हाला शिव्या द्या हिंदूंना का’ जावेद अख्तर यांचा पाक लष्करप्रमुख असीम मुनीरवर संताप

मुंबई: प्रसिद्ध गीतकार, कवी आणि लेखक जावेद अख्तर यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांवर थेट निशाणा साधला आहे. यावेळी त्यांच्या टीकेचा केंद्रबिंदू ठरलेला आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर. असीम मुनीर यांनी हिंदू समाजावर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर जावेद अख्तर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, त्यांना ‘असंवेदनशील’ असा ठपका दिला आहे.

कपिल सिब्बल यांच्या यूट्यूब चॅनलवरील एका चर्चेत बोलताना अख्तर यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, 'जर पाकिस्तानी लष्कर किंवा सरकार चुकीचं वागत असेल, तर त्यांचा राग आमच्यावर काढा. आम्हाला शिव्या द्या, आमच्यावर टीका करा, पण हिंदूंना शिव्या का? पाकिस्तानमध्येही हिंदू राहतात. त्यांचाही विचार केला पाहिजे.'

जावेद अख्तर पुढे म्हणाले की, 'असीम मुनीर हा खूप असंवेदनशील माणूस आहे. मी त्याचं भाषण ऐकलं आहे. जर त्याला भारत आणि भारतीय नकोसे वाटत असतील, तर ते त्याचं वैयक्तिक मत आहे. पण तुझ्या देशातही काही हिंदू आहेत, जरी ते अल्पसंख्याक असले तरी. अशा वक्तव्यांनी त्यांच्या सुरक्षेवर आणि अस्मितेवर परिणाम होतो.'

या चर्चेत त्यांनी पाकिस्तानच्या सर्वसामान्य जनतेबद्दल सहानुभूतीही व्यक्त केली. 'आमचा विरोध पाकिस्तानच्या सरकार, लष्कर आणि दहशतवाद्यांविरुद्ध आहे, सामान्य जनतेविरुद्ध नाही. प्रत्येक देशात चांगले आणि वाईट लोक असतात. पाकिस्तानातीलही लोकांना शांतता हवी आहे. मात्र त्यांचे नेते आणि लष्कर त्यांना चिथावणी देतात,' असेही ते म्हणाले.

जावेद अख्तर यांचे हे वक्तव्य सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहे. त्यांच्या थेट भाष्यामुळे पाकिस्तानच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. असीम मुनीर यांच्या हिंदूविरोधी वक्तव्यावर भारतीय जनतेनेही तीव्र प्रतिक्रिया दिली असून, अनेकांनी अख्तर यांच्या मताला पाठिंबा दर्शवला आहे.

जावेद अख्तर हे पूर्वीही पाकिस्तानातील दहशतवाद, महिलांवरील अन्याय आणि अल्पसंख्यांवरील अत्याचारावर बिनधास्त बोलत आले आहेत. आता त्यांच्या या ताज्या विधानामुळे पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान दरम्यानच्या तणावपूर्ण नात्याचा एक नवा पैलू समोर आला आहे.


सम्बन्धित सामग्री