मुंबई: ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांचे पुण्यात निधन झाले आहे. वयाच्या 79व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि मुघलकालीन दस्तऐवजांवर त्यांनी केलेलं संशोधन इतिहास क्षेत्रासाठी अत्यंत मोलाचं ठरलं. त्यांच्या लिखाणाचा अभ्यास आज अनेक विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांत समाविष्ट आहे. गुरुवारी सकाळी त्यांचे पार्थिव भारत इतिहास संशोधक मंडळ येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.
गेल्या पाच दशकांपासून गजानन मेहेंदळे यांनी संशोधन क्षेत्राला पूर्णवेळ वाहून घेतलं होतं. फारसी, मोडी, इंग्रजी, फ्रेंच, जर्मन अशा अनेक भाषांतील कागदपत्रांचा त्यांनी अभ्यास केला. श्री राजा शिवछत्रपती (खंड १ आणि २), Shivaji His Life and Times, इस्लामची ओळख, आदिलशाही फर्माने यांसारखी त्यांची अनेक महत्त्वपूर्ण पुस्तकं इतिहासप्रेमींमध्ये लोकप्रिय ठरली. शिवचरित्र संशोधनाबरोबरच त्यांनी मुघलकालीन प्रशासन आणि धार्मिक धोरणांवरही लेखन केलं.
पत्रकारितेच्या क्षेत्रातही त्यांनी पाऊल ठेवले होते. वयाच्या अवघ्या २४व्या वर्षी तरुण भारत या वृत्तपत्राचे प्रतिनिधी म्हणून त्यांना बांगलादेशात पाठविण्यात आले होते. बांगलादेश मुक्ती संग्रामाच्या काळात त्यांनी प्रत्यक्ष युद्धपूर्वस्थिती पाहिली होती आणि स्थानिक नागरिक व सैनिकांची मुलाखत घेतली. त्या काळातील त्यांचे वृत्तांकन विशेष चर्चेत आले होते.
गजानन मेहेंदळे यांचे योगदान इतिहास संशोधनापुरते मर्यादित न राहता पुढील पिढ्यांसाठी अमूल्य ठेवा बनले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, मुघलकालीन दस्तऐवजांचा अभ्यास आणि इस्लामी राजवटीच्या धोरणांचे विश्लेषण यामधून त्यांनी संशोधनाचा नवा आयाम निर्माण केला. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील आणि देशभरातील इतिहासप्रेमींची मोठी हानी झाली आहे.