मुंबई: जर तुमच्या बँक खात्यात अचानक कोट्यवधी रुपये आले तर? काही क्षणांसाठी तुम्हाला तुमचे स्वप्न सत्यात उतरल्यासारखे वाटेल आणि कदाचित तुम्हाला यावर विश्वासही नाही बसणार. पण थांबा! हे अचानक जमा झालेले पैसे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतात. अलिकडेच ग्रेटर नोएडामधील एका मृत महिलेच्या खात्यात चुकून अब्जावधी रुपये जमा झाले आणि संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली. मात्र, अशा पद्धतीने पैसे जमा होण्याची ही पहिली वेळ नाही. कारण, अशा अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत.
'ते' पैसे कायदेशीरदृष्ट्या आपले नाहीत -
भारतीय बँकिंग नियम आणि कायद्यानुसार, चुकून तुमच्या खात्यात जमा झालेले पैसे तुम्ही वापरू शकत नाही. ते पैसे ना तुमचे असतात, ना तुमचा त्यावर हक्क असतो. बँक किंवा मूळ मालक हे पैसे परत मागू शकतात आणि तुम्हाला ते पूर्णपणे परत करावे लागतात.
पैसे खर्च केल्यास फसवणुकीचा गुन्हा -
जर तुम्ही हे पैसे तपासल्याशिवाय खर्च केले, ट्रान्सफर केले, किंवा खरेदी केली, तर याला 'फसवणूक', 'गुन्हेगारी विश्वासभंग' किंवा 'गैरवापर' मानले जाऊ शकते. अशा प्रकरणात तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. तुरुंगवास, दंड किंवा दोन्ही शक्यता असतात.
हेही वाचा - आरबीआयची घोषणा... रेपो रेटमध्ये बदल नाही, सर्वसामान्यांच्या कर्जाचा हप्ता कमी होणार नाही
बँक खात्यावर अचानक लाखो रुपये जमा झाल्यास काय करावे?
अशा पद्धतीने तुमच्या खात्यावर पैसे जमा झाल्यास लगेच बँकेला कळवा आणि तक्रार दाखल करा. बँक तुम्हाला चुकून मिळालेले पैसे योग्य खात्यात परत करण्यास सांगेल. जर तुम्हाला कोणत्याही फसवणूकीचा किंवा सायबर गुन्ह्याचा संशय आला तर सायबर सेल किंवा पोलिसांनाही कळवा. सर्व बँकिंग पासवर्ड बदला आणि खात्याची सुरक्षा तपासा.
हेही वाचा - 5 वर्ष पूर्ण होण्याआधीचं तुम्ही नोकरी सोडली का? तरीही 'या' लोकांना मिळू शकते ग्रॅच्युइटीची रक्कम
कायदा काय सांगतो?
भारतीय कायद्यानुसार, चुकून आलेले पैसे वापरणे हे बेकायदेशीर आहे. बँक ही रक्कम परवानगीशिवाय वळती करू शकते. जर बँक किंवा खरा मालक कोर्टात गेला, तर तुमच्यावर कठोर कारवाई होऊ शकते. खात्यात अचानक पैसे दिसल्यास कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी नियम समजून घ्या. एक चुकीचा निर्णय तुमचे आयुष्य बदलू शकतो.