8th Pay Commission: देशातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. 1 जानेवारी 2026 पासून देशभरात वेतन आयोग लागू केला जाणार आहे. अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत लेखी उत्तर सादर करून याबात माहिती दिली आहे. आठवा वेतन आयोग लागू होताच देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन, पेन्शन आणि भत्ते वाढणार आहेत.
दरम्यान, पंकज चौधरी यांनी सांगितले की, अर्थ मंत्रालयाने मंत्रालये, सरकारी विभाग आणि राज्य सरकारांकडून सूचना मागवल्या आहेत. वेतन आयोगाचे उद्दिष्ट महागाई आणि आर्थिक स्थितीच्या आधारावर कर्मचाऱ्यांचे उत्पन्न संतुलित करून त्यांचे राहणीमान सुधारणे आहे. आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर 50 लाखाहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि 65 ते 68 लाख पेन्शनधारकांच्या पगारात आणि भत्त्यांमध्ये वाढ होणार आहे. आठवा वेतन आयोग सरकारी कर्मचाऱ्यांचे राहणीमान सुधारण्याच्या दृष्टीने हे एक मोठे पाऊल मानला जात आहे.
हेही वाचा - सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्त्यात होऊ शकते ''इतकी'' वाढ
आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी 'या' दिवासापासून लागू होणार -
केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला 16 जानेवारी 2025 रोजी मान्यता दिली होती. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी घोषणा केली होती की, आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी 1 जानेवारी 2026 पासून लागू करता येतील. कारण 7 व्या वेतन आयोगाचा कालावधी 31 डिसेंबर 2025 रोजी संपणार आहे. या घोषणेला आज अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी मान्यता दिली. आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर, पगारातील वाढ फिटमेंट फॅक्टरवर आधारित असेल. फिटमेंट फॅक्टर जितका जास्त असेल तितका मूळ पगार वाढेल.
फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय?
फिटमेंट फॅक्टर हा एक प्रकारचा गुणक आहे. वेतन आयोगाच्या बाबतीत हा घटक वापरला जातो. वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या नवीन पगाराची गणना करण्यासाठी फिटमेंट फॅक्टरचा वापर केला जातो. या घटकाचा वापर जुन्या ते नवीन पगारात एकसमान वाढ सुनिश्चित करतो.
हेही वाचा - EPFO कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 33.56 कोटी खात्यात जमा करण्यात आले 8.25 टक्के व्याज
सातव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.57 होता. तथापी, 8 व्या वेतन आयोगात तो 1.90, 2.08, 2.86 यापैकी कोणताही असू शकतो अशी शक्यता आहे. उदाहरण, जर मूळ पगार 18,000 असेल आणि फिटमेंट फॅक्टर 1.90 लागू झाला, तर नवीन पगार 34,200 रुपये होईल. वेतन आयोगाचे मुख्य उद्दिष्ट महागाई दर आणि आर्थिक स्थितीच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांचे उत्पन्न संतुलित ठेवणे आहे. 8 व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी हा लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय ठरणार आहे.