नवी दिल्ली: मुंबईवर 26/11 ला झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या कटामध्ये सहभागी असलेला तहव्वूर राणा याला भारतात परत आणण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. मिळालेल्या खात्रीशीर सूत्रांनुसार, त्याला एक-दोन दिवसांत भारतात दाखल केलं जाण्याची शक्यता आहे.सध्या अमेरिकेमध्ये भारताच्या विविध तपास यंत्रणांचे अधिकारी उपस्थित असून, राणाच्या प्रत्यार्पणासाठी अंतिम कायदेशीर टप्पे पार केले जात आहेत. अमेरिकेने त्याच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिल्यानंतर भारताने या कारवाईत गती आणली आहे.
गुप्त सुरक्षा यंत्रणा सज्ज तहव्वूर राणा भारतात आल्यानंतर त्याला दिल्लीत किंवा मुंबईतील एका उच्च सुरक्षायुक्त तुरुंगात ठेवण्याची योजना आहे. गुप्त माहितीप्रमाणे, सुरुवातीच्या काही आठवड्यांकरिता त्याला NIA च्या कोठडीत ठेवण्यात येणार आहे. हे संपूर्ण ऑपरेशन NSA अजित डोवाल आणि गृह मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली राबवण्यात येणार आहे.
अमेरिकन कोर्टात शेवटचा प्रयत्न फसला राणाने अमेरिकन न्यायालयात याचिका दाखल करत, भारतात पाठवल्यास आपल्याला धोका असल्याचा दावा केला होता. 'भारतामध्ये माझे आयुष्य धोक्यात असेल,' असं त्याने आपल्या याचिकेत नमूद केलं होतं. मात्र, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने त्याचा दावा फेटाळून लावत भारताच्या मागणीला मान्यता दिली आहे.
कोण आहे तहव्वूर राणा ?
एक कटकारस्थानाचा भाग पाकिस्तानी लष्करातील माजी डॉक्टर असलेला तहव्वूर राणा हा ISI आणि लष्कर-ए-तय्यबाशी संबंधित असल्याचं पुराव्यांवरून स्पष्ट झालं आहे. तो 2008 मध्ये हल्ल्यापूर्वी काही दिवस भारतात उपस्थित होता आणि डेव्हिड कोलमन हेडली याला भारतात हेरगिरीसाठी मदत केल्याचा आरोप आहे. राणा कॅनडाचा नागरिक असून, सध्या अमेरिकेत एका पत्रकाराच्या हत्येप्रकरणी शिक्षा भोगत होता. तहव्वूर राणा भारतात आल्यानंतर त्याची कसून चौकशी होणार असून, हल्ल्याच्या षड्यंत्रामागे असलेली संपूर्ण साखळी उघड होण्याची अपेक्षा सगळ्यांकडून केली जात आहे.