नवी दिल्ली: एअर इंडियाने आज पुन्हा 8 उड्डाणे रद्द केली आहेत. आज रद्द केलेल्या 4 आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये दुबई ते चेन्नई फ्लाइट AI906, दिल्ली ते मेलबर्न फ्लाइट AI308, मेलबर्न ते दिल्ली फ्लाइट AI309, दुबई ते हैदराबाद फ्लाइट AI2204 यांचा समावेश आहे. याशिवाय, पुणे ते दिल्ली फ्लाइट AI874, अहमदाबाद ते दिल्ली फ्लाइट AI456, हैदराबाद ते मुंबई फ्लाइट AI-2872 आणि चेन्नई ते मुंबई फ्लाइट AI571 फ्लाइट देखील रद्द करण्यात आल्या आहेत. हे चारही देशांतर्गत उड्डाणे आहेत. देखभाल आणि ऑपरेशनल कारणांमुळे ही उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
अहमदाबाद येथे गेल्या आठवड्यात एअर इंडियाचे विमान कोसळले. या अपघातात 12 क्रू मेंबर्स आणि 230 प्रवाशांसह 275 जणांचा मृत्यू झाला. या विमान अपघाताने संपूर्ण जगाला हादरवून टाकले. या अपघातानंतर एअर इंडियाच्या अनेक विमानांमध्ये तांत्रिक बिघाड आढळून आला. त्यानंतर अनेक विमानाचे आपत्कालीन लँडिंग करावे लागले. तसेच अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली. तथापी, काही उड्डाणांचे मार्ग वळवण्यात आले. भारतीय नागरी उड्डाण मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, अपघातानंतर 12 ते 17 जून दरम्यान एकूण 83 उड्डाणे रद्द करण्यात आली.
हेही वाचा - एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाडाचे सत्र सुरूचं! व्हिएतनामला जाणाऱ्या विमान दिल्लीला परतले
आंतरराष्ट्रीय उड्डाणांच्या संख्येत कपात
दरम्यान, अहमदाबाद विमान अपघातानंतरची परिस्थिती पाहता, एअर इंडियाने त्यांच्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. उड्डाणांच्या संख्येत 15 टक्के कपात करण्यात आली असून ही कपात 15 जुलैपर्यंत लागू राहील.
हेही वाचा - अहमदाबाद विमान अपघात स्थळावर सापडले 70 तोळे सोने आणि 'या' वस्तू !
बोईंग कंपनीच्या विमानांच्या तपासणीमुळे उड्डाणांची संख्या कमी करण्यात आली आहे. याशिवाय, कंपनीने 3 आंतरराष्ट्रीय मार्गांवरील उड्डाणे देखील स्थगित केली आहेत. अहमदाबाद विमान अपघातानंतर डीजीसीएने एअरलाइनच्या 33 बोईंग विमानांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.