लखनऊ: सुभासपाचे आमदार अब्बास अन्सारी यांचे आमदारपद रद्द करण्यात आले आहे. यासोबतच, विधानसभा सचिवालयाने मऊ जागेवर पुन्हा निवडणूक घेण्याचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे पाठवला आहे. शनिवारी न्यायालयाने द्वेषपूर्ण भाषण प्रकरणात अब्बास अन्सारी यांना 2 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. यानंतर, आज रविवारी सचिवालय उघडण्यात आले आणि अब्बास अन्सारी यांचे विधिमंडळ सदस्यत्व रद्द करण्यात आले.
अब्बास अन्सारी यांनी 2022 मध्ये झालेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीदरम्यान वादग्रस्त विधान केले होते, ज्याचा खटला न्यायालयात सुरू होता. शनिवारी न्यायालयाने त्यांना त्याच प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा सुनावली. आता यानंतर त्यांना दुहेरी धक्का बसला असून त्यांचे आमदारपदही गेले आहे. असं म्हटलं जात आहे की, आता मऊ जागेवरील पोटनिवडणूक लवकरच जाहीर होऊ शकते. परंतु जर अब्बास अन्सारी यांनी त्यांच्या शिक्षेबाबत उच्च न्यायालयात धाव घेतली आणि नंतर न्यायालयाने शिक्षेला स्थगिती दिली तर त्यांचे आमदारपदही परत येऊ शकते.
हेही वाचा - अब्बास अन्सारीला मोठा झटका! द्वेषपूर्ण भाषण प्रकरणात 2 वर्षांची शिक्षा
सुभासपा सध्या सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडी सरकारचे सहयोगी आहेत. सुभासपाचे अध्यक्ष ओम प्रकाश राजभर हे उत्तर प्रदेशात कॅबिनेट मंत्री आहेत. अब्बास अन्सारी यांच्या आधी त्यांचे वडील, बाहुबली राजकारणी मुख्तार अन्सारी यांनी मऊ सदर मतदारसंघातून बराच काळ निवडणूक जिंकली होती. योगी सरकारमधील मंत्री ओम प्रकाश राजभर हे अब्बास अन्सारी यांच्या शिक्षेविरुद्ध उच्च न्यायालयात अपील करतील. अब्बास अन्सारी 2022 मध्ये ओम प्रकाश राजभर यांच्या पक्षाच्या सुहेलदेव भारतीय समाज पक्षाकडून मऊ येथून आमदार म्हणून निवडून आले होते.
हेही वाचा - ठरलं तर मग! क्रिकेटपटू रिंकू सिंग आणि खासदार प्रिया सरोज अडकणार लग्नबंधनात
दरम्यान, अब्बास अन्सारी हे उत्तर प्रदेशच्या 18 व्या विधानसभेतील सहावे आमदार आहेत. परंतु, आता त्यांची आमदरकी रद्द झाली आहे. अब्बास यांच्या आधी आझम खान, अब्दुल्ला आझम, इरफान सोलंकी, विक्रम सैनी आणि रामदुलार गोंड यांनी त्यांचा आमदार दर्जा गमावला आहे.