Sunday, August 31, 2025 10:37:00 AM

Raghav Chadha On AI Tools Subscription: सर्व नागरिकांना प्रगत एआय टूल्सचे मोफत सबस्क्रिप्शन द्यावे; संसदेत राघव चढ्ढा यांची मागणी

भारतातील प्रत्येक नागरिकाला चॅटजीपीटी, जेमिनी, क्लॉड यांसारख्या प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) टूल्सचे मोफत सबस्क्रिप्शन उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी राघव चढ्ढा यांनी केली आहे.

raghav chadha on ai tools subscription सर्व नागरिकांना प्रगत एआय टूल्सचे मोफत सबस्क्रिप्शन द्यावे संसदेत राघव चढ्ढा यांची मागणी
Raghav Chadha

Raghav Chadha On AI Tools Subscription: संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आम आदमी पक्षाचे राज्यसभेचे खासदार राघव चढ्ढा यांनी बुधवारी एक महत्त्वाची मागणी उपस्थित केली. भारतातील प्रत्येक नागरिकाला चॅटजीपीटी, जेमिनी, क्लॉड यांसारख्या प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) टूल्सचे मोफत सबस्क्रिप्शन उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी राघव चढ्ढा यांनी केली आहे. 

राघव चढ्ढा यांनी सांगितले की संयुक्त अरब अमिराती (यूएई), सिंगापूर आणि चीनसारखे देश नागरिकांना मोफत एआय सबस्क्रिप्शन देत आहेत. भारतानेही या दिशेने पाऊल उचलून नागरिकांना आधुनिक तंत्रज्ञानाचा मोफत लाभ द्यावा. एआय हे फक्त तंत्रज्ञान नाही, तर मोठी स्वप्ने पाहण्याची आणि ती सत्यात उतरवण्याची संधी आहे, असेही चढ्ढा यांनी यावेळी स्पष्ट केले. 

हेही वाचा - Agni 5’ Ballistic Missile : भारताने घेतली अग्नी-5 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

दरम्यान, राघव चढ्ढा यांनी नमूद केले की, एआयमुळे शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी तसेच वृद्ध नागरिकांनाही फायदा होईल. तसेच एआय भारताची उत्पादकता वाढवून वेळेची बचत करण्यास मदत करेल. एका संशोधनानुसार, एआय 2030 पर्यंत तब्बल 15 ट्रिलियन डॉलर्सचे मूल्य निर्माण करेल. जर आपण या शर्यतीसाठी आत्ताच तयारी केली नाही, तर या शर्यतीत भारत खूप मागे राहील. 

हेही वाचा - CJI B R Gavai : निवडून आलेले सरकार राज्यपालांच्या मर्जीवर अवलंबून राहावे का? राष्ट्रपतींच्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाचे उत्तर

डिजिटल इंडियाच्या दिशेने मोठे पाऊल - 
कोड लिहिणे असो, डेटा विश्लेषण असो किंवा सरकारी फॉर्म भरणे असो, ही सर्व कामे एआयच्या मदतीने जलद आणि सहजपणे करता येतात. डिजिटल लोकशाहीच्या दिशेने हे पुढचे पाऊल ठरेल, असा विश्वासही यावेळी राघव चढ्ढा यांनी व्यक्त केला. तथापी, राघव चढ्ढा यांनी शेवटी सरकारला आवाहन केले की, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या या क्रांतीत कोणताही भारतीय मागे राहू नये. भारत खऱ्या अर्थाने डिजिटल इंडिया बनावा, यासाठी सरकारने तातडीने पावले उचलावीत, अशी ठाम मागणी चढ्ढा यांनी यावेळी सभागृहात केली.
 


सम्बन्धित सामग्री