नवी दिल्ली: देशाचे गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाहा यांनी त्यांच्या राजकीय भविष्याबद्दल मोठे विधान केले आहे. अमित शाहा यांनी म्हटलं आहे की, त्यांनी राजकारणातून निवृत्तीची योजना आखली आहे. जेव्हा ते निवृत्त होतील तेव्हा ते त्यांचे आयुष्य वेद आणि उपनिषदे वाचून घालवतील. तसेच अमित शाहा यांनी नैसर्गिक शेती करण्याची इच्छा देखील व्यक्त केली आहे. आंतरराष्ट्रीय सहकारी वर्षाच्या निमित्ताने अमित शाहा यांनी बुधवारी गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील सहकारी क्षेत्रातील महिला आणि इतर सहकारी कामगारांशी 'सहकारी संवाद' कार्यक्रमादरम्यान संवाद साधला.
अमित शाहा निवृत्तीनंतर नैसर्गिक शेती करणार -
अमित शाहांनी 'सहकार-संवाद' कार्यक्रमात म्हटलं की, 'मला शेती करायला आवडते, मी निवृत्तीनंतर नैसर्गिक शेती करेन. त्यांनी असेही म्हटले की त्यांना वेद, उपनिषदे अभ्यासायला आवडतात. सध्या यासाठी मला वेळ मिळत नाही. परंतु, निवृत्तीनंतर माझा वेळ मी यात घालवीन. तथापी, नैसर्गिक शेती खूप महत्त्वाची आहे, हा एक प्रकारचा वैज्ञानिक प्रयोग आहे जो अनेक प्रकारचे फायदे देतो.'
हेही वाचा - ''सहकारी मॉडेलच्या आधारे राष्ट्रीय टॅक्सी योजना सुरू केली जाईल'' - अमित शाह
दरम्यान, नैसर्गिक शेतीचे फायदे सांगताना अमित शहा म्हणाले की, रासायनिक खतांचा वापर करून पिकवलेल्या गव्हामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. नैसर्गिक शेतीमुळे शरीर रोगमुक्त राहण्यास मदत होतेच, शिवाय शेतीची उत्पादकताही वाढते. आपण सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. शरीर निरोगी ठेवण्यासाठी खतांशिवाय अन्न खाणे आवश्यक आहे, जर असे झाले तर औषधांची गरज भासणार नाही, असंही शाहांनी यावेळी नमूद केलं.
हेही वाचा - ''1 हजार DNA चाचण्या केल्या जातील''; अहमदाबाद विमान अपघातानंतर अमित शाहाचे मोठे विधान
अमित शाहांनी म्हटलं आहे की, सहकार मंत्रालय पंतप्रधान मोदींच्या 'सहकार से समृद्धी' या दृष्टिकोनानुसार शेतकऱ्यांना सक्षम करून ग्रामीण अर्थव्यवस्थेसह देशाची अर्थव्यवस्था मजबूत करत आहे.' तथापी, सहकार संवाद' मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही लोकांच्या प्रश्नांची उत्तरेही दिली.