वक्फ सुधारणा विधेयक 2025 ला लोकसभेने मंजुरी दिली असून, यावर विरोधी पक्षांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. काल रात्री झालेल्या मतदानात 288 मतांनी विधेयकाला समर्थन मिळाले, तर 232 खासदारांनी याला विरोध दर्शवला. या विधेयकामुळे मोदी सरकारला मोठे यश मिळाले असले तरी, विरोधकांनी त्याला संविधानविरोधी ठरवत आक्षेप नोंदवले आहेत. आता हे विधेयक राज्यसभेत सादर करण्यात येणार आहे.
ओवैसींची आक्रमक भूमिका
एआयएमआयएमचे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी लोकसभेत चर्चेत भाग घेताना महात्मा गांधींचे उदाहरण देत वक्फ दुरुस्ती विधेयकाविरुद्ध नाट्यमय निषेध केला. त्यांनी विरोध दर्शवण्यासाठी विधेयकाची प्रत फाडली आणि संतप्त होत लोकसभेतून निघून गेले. ओवैसी यांनी भाजपावर आरोप करत म्हटले की, 'भाजपा देशात संघर्ष निर्माण करत आहे. मुस्लिम समाजाच्या हक्कांवर घाला घालणारे हे विधेयक असह्य आहे.'
हेही वाचा: Waqf Amendment Bill 2025: वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर, मध्यरात्री नेमकं काय घडलं?
त्याचबरोबर, काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी या विधेयकाला मुस्लिम समाजावरील अन्यायकारक कारवाई असल्याचे सांगितले आहे. राहुल गांधींसह अनेक नेत्यांनी मोदी सरकारवर धार्मिक ध्रुवीकरणाचा आरोप केला आहे. काँग्रेसने स्पष्ट केले की, हा कायदा कलम 25 अंतर्गत दिलेल्या धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकारांचे उल्लंघन करतो. ओवैसी यांनीही हे विधेयक 'संविधानविरोधी' असल्याचा दावा केला आहे.
सरकारने या विधेयकाचे समर्थन करताना सांगितले की, हा कायदा वक्फ बोर्डाच्या कार्यक्षमतेत सुधारणा करेल आणि पारदर्शकता वाढवेल. तसेच, समाजाच्या सर्व गटांना यात प्रतिनिधित्व मिळेल, असे केंद्रीय मंत्री यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकारचा भाग असलेल्या टीडीपी, जेडीयू आणि एलजेपी यांनी या विधेयकाला पाठिंबा दर्शवला आहे.
हेही वाचा: 'मुस्लिमांचे अधिकार हिरावले जातायेत'; वक्फ दुरुस्ती विधेयकावरुन राहुल गांधींचा हल्लाबोल