Thursday, August 21, 2025 12:09:05 AM

BSNL 2007 नंतर पहिल्यांदाच फायद्यात, डिसेंबर तिमाहीत कमवला 262 कोटींचा नफा

BSNL in Profit : केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले, 'तिमाही नफा हा बीएसएनएलसाठी महत्त्वाचा टप्पा आहे. आता बीएसएनएल देशभरातील सर्व ग्राहकांसाठी 4 जी सेवेच्या दिशेने वाटचाल करत आहे.

bsnl 2007 नंतर पहिल्यांदाच फायद्यात डिसेंबर तिमाहीत कमवला 262 कोटींचा नफा

नवी दिल्ली : देशातील सरकारी मालकीची दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच BSNL तब्बल 17 वर्षांनी पहिल्यांदा नफ्यात आली आहे. डिसेंबर तिमाहीत बीएसएनएलने 262 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमवला आहे. बीएसएनएलने शेवटचा तिमाही नफा 2007 मध्ये नोंदवला होता. दुसरीकडे नफ्याबरोबरच बीएसएनएलचे ग्राहकही वाढले असून, डिसेंबरमध्ये ग्राहकांची संख्याही 9 कोटींवर पोहोचली आहे, जी जूनमध्ये 8.4 कोटी होती.

एक काळ होता, ज्यावेळी बीएसएनएलच्या मोबाईल, सेल्यूलर सेवा आणि लँडलाईन सेवेचा दबदबा होता. मात्र, मध्यंतरीच्या काळात जवळपास 17 वर्षांमध्ये मोबाईल कंपन्यांमधील प्रचंड वाढती स्पर्धा, लँडलाईनचा घरगुती वापर कमी होणे अशा अनेक बाबींमुळे सरकारी कंपनी बीएसएनएल मोठ्या तोट्यात गेली होती. अनेक खासगी कंपन्यांनाही टाळं ठोकावं लागलं होतं. 3 जी, 4 जी, 5 जीच्या स्पर्धेत तसेच, मोबाईल रिचार्ज स्वस्त करण्याच्या स्पर्धेत काही बोटावर मोजण्याइतक्या कंपन्या बलाढ्य झाल्या. मात्र, बीएसएनएलचे मोबाईल रिचार्ज सर्वांपेक्षा स्वस्तच होते. मात्र, सेवा देण्यात कमी पडत असल्याने बीएसएनएल मागे पडली होती. त्यामुळे ग्राहकही कंटाळून पाठ फिरवून निघून गेले होते. अशा स्थितीमध्ये बीएसएनला कात टाकण्याची गरज होती. केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी या बाबतीत सकारात्मक संकेत दिले आहेत. यामुळे बीएसएनएल पुन्हा एकदा ग्राहकांना आकर्षित करू शकेल, अशी आशा निर्माण झाली आहे. सध्या दूरसंचार क्षेत्रात ठराविक लोकांची मक्तेदारी झाल्यामुळे ग्राहकांच्या खिशाला जी झळ बसू लागली होती, ती कमी होण्याची चिन्हे निर्माण होऊ शकतील. त्यामुळे बीएसएनएल फायद्यात येणे आणि पुढच्या काळात बीएसएनएलच्या सेवेत आणखी सुधारणा होणे, ही ग्राहकांसाठी नक्कीच खुशखबर आहे.

हेही वाचा - 'पत्नीचं दुसर्‍या व्यक्तीवरील प्रेम हा व्यभिचार नाही...' 'अशा' परिस्थितीत द्यावी लागेल पोटगी - उच्च न्यायालय

BSNL In Profit: 17 वर्षांत प्रथमच तिमाही नफा
पीटीआयच्या वृत्तानुसार, केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी नुकतीच याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले की, 'आजचा दिवस भारताच्या दूरसंचार क्षेत्रासाठी खूप महत्त्वाचा आहे. पंतप्रधान मोदींचे स्वप्न आहे की दूरसंचार क्षेत्र भारताच्या डिजिटल भविष्याला चालना देईल. हे लक्ष्य साध्य करण्याच्या दिशेने, बीएसएनएलने 2024-25 या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत 17 वर्षांत प्रथमच तिमाही नफा नोंदवला आहे.'

सिंधिया यांनी पुढे सांगितले की, 'या तिमाहीत बीएसएनएलच्या सेल्युलर मोबिलिटीमध्ये 15 टक्के, एफटीटीएचमध्ये 18 टक्के आणि लीज्ड लाईन्समध्ये 14 टक्क्यांनी वाढ झाली. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली, बीएसएनएल नफ्याच्या मार्गावर वाटचाल करत आहे. आम्हाला अपेक्षा आहे की, चौथ्या तिमाहीत कंपनीचा महसूल वाढेल.”

बीएसएनएलसाठी महत्त्वाचा टप्पा
याबाबत अधिक माहिती देताना ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले, 'या तिमाहीत नफ्यात येणे हा बीएसएनएलसाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. कारण, आता बीएसएनएल देशभरातील सर्व ग्राहकांना 4 जी सेवा प्रदान करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. 1,00,000 टॉवर्सपैकी सुमारे 75,000 टॉवर बसवले गेले आहेत, त्यापैकी सुमारे 60,000 कार्यरत आहेत. आम्हाला आशा आहे की, या वर्षी जूनपर्यंत सर्व 1,00,000 टॉवर्स कार्यान्वित होतील.'

हेही वाचा - WAQF Bill 2024: वक्फ बोर्ड कायदा काय आहे? संसदेत इतका गोंधळ कशासाठी?

गुणवत्तेमुळे ग्राहकांचा विश्वास वाढला
बीएसएनएलचे सीएमडी ए रॉबर्ट जे. रवी म्हणाले की, 'बीएसएनएलने आपले खर्च कमी केले आहेत. यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत 1800 कोटी रुपयांपेक्षा जास्त तोटा कमी झाला आहे. ग्राहक सेवांसाठी आम्ही सर्व FTTH ग्राहकांसाठी वायफाय रोमिंग, BITV आणि IFTV सारखे नवीन उपक्रम सादर केले आहेत. गुणवत्तेमुळे आमच्या ग्राहकांचा आमच्यावरील विश्वास वाढला आहे.'


सम्बन्धित सामग्री