Thursday, August 21, 2025 12:09:57 AM

Vice President Election 2025: कोण होणार उपराष्ट्रपती?, उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक कशी होते? जाणून घ्या..

एनडीएचे सी पी राधाकृष्णन की इंडीया आघाडीचे बी सुदर्शन रेड्डी, कोण होणार देशाचे नवे उपराष्ट्रपती? नऊ सप्टेंबरला होणाऱ्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी हे दोन महत्वाचे उमेदवार रिंगणात आहेत.

vice president election 2025 कोण होणार उपराष्ट्रपती उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक कशी होते जाणून घ्या

मुंबई: एनडीएचे सी पी राधाकृष्णन की इंडीया आघाडीचे बी सुदर्शन रेड्डी, कोण होणार देशाचे नवे उपराष्ट्रपती? या प्रश्नाचं उत्तर नऊ सप्टेंबरला मिळेल. नऊ सप्टेंबरला होणाऱ्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी हे दोन महत्वाचे उमेदवार रिंगणात आहेत. माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रकृतीच्या कारणास्तवर आपल्या पदाचा राजीनामा दिल्यावर हे पद रिक्त होतं. उपराष्ट्रपतीपदाची निवडणुक ही देशातील इतर निवडणुकांसारखी नसते. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपेक्षाही ही निवडणूक वेगळी असते.

उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक कशी होते?

उपराष्ट्रपतीपदासाठी फक्त खासदार मतदान करतात. लोकसभेचे आणि राज्यसभेचे खासदार मतदान करतात. विधानसभा, विधानपरिषदेचे आमदार मतदार नसतात. लोकसभेचे 543 खासदार निवडणुकीत मतदान करतात. राज्यसभेचे 288 खासदार निवडणुकीत मतदान करतात. राष्ट्रपतीनियुक्त राज्यसभेचे 12 खासदारही मतदान करतात. एकूण 788 खासदार या निवडणुकीचे मतदार असतात. राज्यघटनेच्या कलम 66 नुसार ही निवडणूक पार पडते. उपराष्ट्रपतीपदासाठी प्रत्येक मताला समान मूल्य असते. प्रोफेशनल रिप्रेझेंटेशन सिस्टीमनुसार (Proportional Representation System) निर्णय होतात. प्रत्येक मतदाराचं मत हे गोपनीय पद्धतीने नोंदवलं जातं. कोणत्याही पक्षाला खासदारांसाठी व्हिप जारी करता येत नाही. खासदारांना स्वतःच्या विवेकबुद्धीनुसार मतदानाचे स्वातंत्र्य आहे. 

130th Amendment Bill: केंद्रीय गृहमंत्री शाह आज संसदेत 130वे घटनादुरुस्ती विधेयक सादर करणार; पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यासाठी नवीन कायदा येणार

एनडीएचे सीपी राधाकृष्णन यांचा राजकीय अनुभव प्रदीर्घ आहे. तर इंडिया आघाडीचे बी सुदर्शन रेड्डी हे निवृत्त न्यायाधीश आहेत. त्यांचा न्यायिक क्षेत्रातील अनुभव प्रदीर्घ आहे. दोन्ही उमेदवार दक्षिण भारतातील आहेत. पण ही निवडणूक बी सुदर्शन रेड्डी यांच्यासाठी सोपी नसेल आणि त्याला कारण संसदेतील दोन्ही बाजूंचं बलाबल आहे. 

संसदेत कोणाचं पारडं जड?
एकूण मतदारांची संख्या 788 आहे. विजयासाठी किमान 394 मते लागतात. एनडीएचे लोकसभेत 293 खासदार आहेत आणि एनडीएचेच राज्यसभेत 130 खासदार आहेत असे एनडीएचे एकूण संख्याबळ 423 आहे. तर इंडिया आघाडीचं संख्याबळ 312 आहे. 47 खासदार आघाडीत नाहीत. 

उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. त्यामुळे हे पद सत्ताधारी पक्षासाठी अत्यंत महत्वाचे असते. गुप्त मतदान असल्यामुळे दोन्ही बाजूंकडून जोरदार प्रचार होईल. पण पक्षीय बलाबल पाहता ही निवडणूक इंडिया आघाडीसाठी फारशी सोपी नक्की नसेल.
 


सम्बन्धित सामग्री