INDIA Alliance meeting at Rahul Gandhi's residence
Edited Image
नवी दिल्ली: आज दिल्लीतील राहुल गांधी यांच्या निवासस्थानी इंडिया ब्लॉकच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला 25 विरोधी पक्षांचे सुमारे 50 नेते उपस्थित होते. बैठकीचा मुख्य उद्देश लोकसभा निवडणुकीत झालेल्या संभाव्य हेराफेरीचा मुद्दा उचलणे आणि पुढील कृती ठरवणे हा होता. या बैठकीला सहभागी झालेल्या पक्षांमध्ये काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी, आरएलपी, सपा, आरजेडी, व्हीआयपी, सीपीआय, सीपीएम, सीपीएमएल, फॉरवर्ड ब्लॉक, जेएमएम, टीएमसी, एनसीपी (शरद पवार गट), शिवसेना (उद्धव ठाकरे गट), डीएमके, व्हीसीके, आरएसपी, आययूएमएल, केरळ काँग्रेस (एम), केरळ काँग्रेस (जे), एमएनएम, एमडीएमके, केएमडीके आणि पीडब्ल्यूके यांचा समावेश होता.
दरम्यान, बैठकीत राहुल गांधी यांनी पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनद्वारे निवडणुकीत कशी हेराफेरी केली गेली याचे दाखले सादर केले. त्यांनी कर्नाटक, महाराष्ट्र आणि बिहारमधील उदाहरणे देत मतदार याद्यांमधील अनियमितता, निवडणूक आयोगाच्या कार्यशैलीबद्दल प्रश्न उपस्थित केले.
हेही वाचा - ''राहुल गांधींच्या मेंदूची चिप चोरी झालीय''; देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधींवर निशाणा
11 ऑगस्टला निवडणूक आयोगावर मोर्चा -
आजच्या बैठकीत असे ठरविण्यात आले आहे की, 11 ऑगस्ट रोजी सर्व इंडिया ब्लॉक नेते संसदेपासून निवडणूक आयोगापर्यंत मोर्चा काढतील. या बैठकीत राहुल गांधींनी सर्व नेत्यांसमोर पीपीटी सादरीकरण दिले. राहुल गांधींनी सर्व इंडिया ब्लॉक नेत्यांना निवडणुकीत कशी हेराफेरी होत आहे हे सांगितले. या बैठकीला आरजेडीचे तेजस्वी यादव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, राज्यसभा खासदार कमल हासन, मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार, उद्धव ठाकरे, फारुख अब्दुल्ला, अखिलेश यादव, तिरुची शिवा, अभिषेक बॅनर्जी उपस्थित होते.
हेही वाचा - ''लोकांचा मतदार यादीवर विश्वास नाही...''; राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर पुराव्यांसह उपस्थित केले गंभीर प्रश्न
'मतदान हक्क यात्रा'ची घोषणा -
याशिवाय, बैठकीत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला की, INDIA ब्लॉक 17 ऑगस्टपासून बिहारमध्ये 'मतदान हक्क यात्रा' सुरू करेल. ही यात्रा 30 ऑगस्ट रोजी पाटणामध्ये एकत्रित रॅलीसह संपणार आहे. या यात्रेत राहुल गांधी आणि तेजस्वी यादव सहभागी होणार आहेत. तथापी, सीपीआयचे महासचिव डी. राजा यांनी सांगितले की, आजची बैठक अत्यंत फलदायी होती. राहुल गांधींनी सर्व पक्षनेत्यांशी थेट संवाद साधला. या बैठकीत देशभरात मतदार नोंदणी व यादीतील गैरप्रकारांविषयी चिंता व्यक्त करण्यात आली.