Monday, September 01, 2025 01:46:34 PM

Kancha Gachibowli Forest: पाच लाख नोकऱ्यांसाठी 400 एकरची जंगलतोड; काय आहे कांचा गचिबोवली वृक्षतोड प्रकरण?

गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर हैदराबादमधील जंगलतोडीची अनेक छायाचित्रे आणि व्हिडिओ व्हायरल झाले. सर्वोच्च न्यायालयाने तेलंगणा सरकारला कांचा गचिबोवली वनक्षेत्रातील जंगलतोड थांबविण्याचे निर्देश दिले.

kancha gachibowli forest पाच लाख नोकऱ्यांसाठी 400 एकरची जंगलतोड काय आहे कांचा गचिबोवली वृक्षतोड प्रकरण

Kancha Gachibowli Forest Issue : रस्ते आणि विकासाच्या नावाखाली जगभरात जंगलांची आणि झाडांची कत्तल केली जात आहे. यामुळे पशु-पक्ष्यांची घरे नष्ट होत आहेत आणि पशु-पक्षी बेघर होत आहेत. आता सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत असून यात रात्रीच्या अंधारात मोरांचा, प्राणी-पक्ष्यांचा ओरडण्याचा आवाज येत आहे. हैदराबाद विद्यापीठात 400 एकर जमिनीवरील झाडे तोडत असताना तिथल्या मोरांनी अक्षरशः किंकाळ्या फोडल्याचा हा आवाज आहे. या भागातील सर्व प्राणी-पक्षी स्वतःचं घर नष्ट होताना पाहून आणि स्वतःच्या पिल्लांचा डोळ्यादेखत होणारा मृत्यू पाहून अतीव दुःखानं अगदी हंबरडा फोडून रडत असल्याचं चित्र दिसत आहे. रात्रीच्या अंधारातले हे दृश्य आणि मोरांचा आवाज हे सर्वच पाहणं अत्यंत वेदनादायी आहे. यात अनेक निष्पाप प्राण्यांचा मृत्यू झाल्याचेही वृत्त आहे.

गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर जंगलतोडीची अनेक छायाचित्रे व्हायरल झाली. या छायाचित्रांमध्ये जंगलतोडीमुळे प्राणी, पक्षी आपापल्या अधिवासातून बाहेर निघत असल्याचे दिसून आले. संपूर्ण देशभरातून या जंगलतोडीला विरोध केला गेला. मुख्य म्हणजे गुरुवारी (३ एप्रिल) सर्वोच्च न्यायालयानेदेखील तेलंगणा सरकारला कांचा गचिबोवली वनक्षेत्रातील जंगलतोड थांबविण्याचे निर्देश दिले.
फेब्रुवारीमध्ये हैदराबाद विद्यापीठाच्या (UOH) शेजारील असणाऱ्या सुमारे 400 एकर वनजमिनीचा लिलाव तेलंगणा सरकारने केला होता. येथे जंगलतोड करून आयटी पार्क बांधण्यासाठी या जमिनीचा लिलाव करण्यात आला. यामुळे येथे पाच लाख नोकऱ्या निर्माण होण्यासह सरकारी तिजोरीला फायदा होईल, असे तेलंगणा सरकाने म्हटले. या निर्णयाच्या विरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलने केली. मात्र, विद्यार्थ्यांची आंदोलने चिरडण्याचा आणि मोडीत काढण्याचा प्रयत्न झाला. जंगल तोडून इथं इमारती उभारल्या जातील, हा निर्णय विकास प्राधिकरणाने कायम ठेवत जंगल तोडीसाठी सुट्ट्यांची वेळ निवडली. धक्कादायक बाब म्हणजे रात्रीच्या अंधारात अनेक बुलडोजर आणि कटिंग मशीन ने ही जंगल तोड सुरू होती यामुळे जंगलात राहणारे मोर, इतर पशुपक्षी, हरणे बेघर झाली आणि त्यांचा केविलवाणा ओरडण्याचा आवाज येऊ लागला. अगदी माणसं रडत असल्यासारखा हा आवाज या व्हिडिओत ऐकू येत आहे आणि पशुपक्ष्यांचा हा टाहो ऐकून मन हेलावून जात आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

हेही वाचा - Heatwave Alert: वायव्य भारतात उष्णतेच्या लाटेचा इशारा; दिल्लीत पारा 42 अंशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता

सोशल मीडियावर अनेक अकाउंट्‍सवरून हा व्हिडिओ शेअर केला जात आहे. तेलंगणाच्या हैदराबाद शहरात मध्यवर्ती भागात असलेल्या गचिबोवलीजवळ एका जंगलात हा प्रकार घडला. हैदराबादमध्ये जवळपास 400 एकर परिसरात कांचा जंगल आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणावर झाड आहेत अनेक पशुपक्षी इथे आढळतात. कांचा जंगलाला हैदराबादचं फुप्फुस असंही म्हटलं जातं. शेकडो एकर परिसरात पसरलेल्या या जंगलात रात्रीच्या अंधारात झाडांची कत्तल सुरू होती. लागोपाठ सुट्ट्या असल्याने हैदराबाद विद्यापीठात विद्यार्थी-विद्यार्थिनी घरी गेले होते. त्यावेळी ही झाडं कापली जात होती. विद्यापीठाच्या आजूबाजूला हा हिरवागार परिसर असून जंगलतोडीच्या विरोधात विद्यार्थी आक्रमक झाले आहेत.

स्थानिक लोक पर्यावरणवादी आणि विद्यार्थ्यांनी कांचा जंगलातील वृक्षतोडीविरोधात न्यायालयात धाव घेतली. राष्ट्रीय उद्यान घोषित करून हे जंगल संरक्षित करावे, अशी मागणी होत आहे. या ठिकाणी 455 पेक्षा जास्त प्रजाती असल्याचे समजत आहे. हैदराबाद विद्यापीठाच्या परिसरातले हे जंगल तोडून विकासकाम सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

विद्यार्थी आणि पर्यावरणवाद्यांकडून विरोधानंतर तेलंगणा हायकोर्टाने कांचा जंगल जंगलातील वृक्षतोडीला स्थगिती दिली विकास कामांना स्थगिती दिली. पुढील सुनावणी पर्यंत काम थांबवण्याचे आदेश दिले आणि आता सर्वोच्च न्यायालयानेदेखील हे प्रकरण स्वतःच्या हाती घेत, जंगलतोड थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. नेमके हे प्रकरण काय? 400 एकर जंगलतोडीचे कारण काय? आणि त्याचा अर्थ काय? त्याविषयी जाणून घेऊ.

गजबजलेल्या शहराच्या मधोमध वसलेले जंगल
कांचा गचिबोवली हे जंगल शहराच्या मधोमध वसलेले एकमेव जंगल आहे. हैदराबादमध्ये शहरात वसलेले हे एकमेव जंगल शिल्लक राहिले आहे. कांचा गचिबोवली जंगल जैवविविधतेने समृद्ध असून असंख्य पक्षी, सस्तन प्राणी आणि सरपटणाऱ्या प्राण्यांच्या प्रजातींचे अधिवास क्षेत्र आहे. या जंगलात खडकांच्या सुंदर रचना आढळून येतात. तेलंगणा इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर कॉर्पोरेशनने या जमिनीचा लिलाव केल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्याविरोधात मोठ्या प्रमाणावर आंदोलने केली. हे जंगल जैवविविधतेने समृद्ध असल्याचा मुद्दा घेऊन विद्यार्थ्यांकडून आंदोलने केली गेली. कांचा गचिबोवली जंगल शहराला सावली प्रदान करते, शहरातील तापमान नियंत्रणात ठेवते, आर्द्रता वाढवते, असे पर्यावरण विश्लेषकांचे म्हणणे आहे.

हेही वाचा - Ratan Tata Will: रतन टाटांच्या मृत्युपत्रात 3800 कोटींचे दान; नोकर आणि पाळीव कुत्र्यालाही दिला मालमत्तेत मोठा वाटा

या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या सहभागाचे कारण काय?
30 मार्च रोजी तेलंगणा सरकारने जंगलातील जमीन साफ करण्याचे आदेश दिले. त्यासाठी जवळजवळ 50 मातीकाम कामगार विद्यापीठाच्या परिसरात गेले. विद्यार्थ्यांनी त्यांचे काम रोखू नये म्हणून बॅरिकेडिंगसुद्धा केले गेले. त्यानंतर विद्यार्थी आक्रमक झाले आणि विद्यापीठ परिसरात आंदोलनाला सुरुवात झाली. या प्रकरणात 53 विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आंदोलक व पोलिसांमध्ये चकमक झाली आणि अनेक विद्यार्थी जखमी झाले. असे असूनही कामगारांनी आपले काम सुरूच ठेवले. त्यानंतर विद्यार्थी संघटनेकडून संपाची घोषणा करण्यात आली. सोशल मीडियामुळे या प्रकरणाकडे संपूर्ण देशाचे लक्ष वेधले गेले आणि सर्व स्तरांतून विरोध होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर तेलंगणा उच्च न्यायालयात दोन जनहित याचिका (पीआयएल) दाखल करण्यात आल्या.
 


सम्बन्धित सामग्री