उत्तराखंडमधील पर्वतीय भागात बर्फवृष्टी सुरू आहे. यामुळे अनेक ठिकाणी कर्फ्यूसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्याच्या विविध भागांतून हिमस्खलन, मार्ग बंद होणे आणि तापमानात मोठी घट यासारख्या समस्यांचे वृत्त समोर येत आहेत. यात खासकरून चमोली, उत्तरकाशी, रुद्रप्रयाग, पिथोरागड आणि बागेश्वर या जिल्ह्यांमध्ये बर्फवृष्टीचा प्रचंड फटका बसल्याचे दिसून येत आहे.
चमोली जिल्ह्यात मागील 48 तासांपासून बर्फवृष्टी सुरू असून जिह्यात मोठे हिमस्खलन झाले आहे. यामध्ये बॉर्डर रोड ऑर्गेनाइजेशन प्रोजेक्टसाठी काम करणारे मजूर अडकले होते. या प्रोजेक्टसाठी 57 लोकं काम करत होती. यापैकी दोन जण हे सुट्टीवर होते. राहिलेले 55 मजूर हे बर्फाखाली अडकले. तेव्हा 55 मजूरांपैकी 47 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून 8 जण अद्याप बेपत्ता आहेत. बचावकार्य वेगाने सुरू आहे. सेना, इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिस (ITBP), BRO, SDRF आणि NDRF यांच्या संयुक्त पथकांकडून ही शोधमोहीम राबवली जात आहे. जखमी कामगारांवर माना येथील ITBP हॉस्पिटलमध्ये जखमी उपचार सुरू आहेत.
गंगोत्री महामार्ग बंद, सीमावर्ती भाग ठप्प
उत्तराखंडच्या सीमेवरील रस्ते बर्फवृष्टीमुळे पूर्णपणे ठप्प झाले आहेत. गंगोत्री महामार्गावरील गंगाणीच्या पलीकडे वाहतूक पूर्णतः ठप्प आहे. गंगाणी आणि गंगोत्री दरम्यानच्या महामार्गावर डबराणी येथे हिमस्खलन झाले आहे. यामुळे पर्यटक आणि स्थानिक रहिवाशांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
हेही वाचा - School Blast: विद्यार्थी की गुन्हेगार? शाळेतील शौचालयात घडवून आणला स्फोट; चौथीची मुलगी जखमी, कारण समजल्यावर सगळे हादरले
40 हून अधिक गावे बर्फाच्या विळख्यात
चमोली जिल्ह्यातील बद्रीनाथ, हेमकुंड साहिब, औली, ज्योतिर्मठ आणि गोपेश्वरसह 40 हून अधिक गावे पूर्णतः बर्फाच्छादित झाली आहेत. या भागांमध्ये दोन दिवसांपासून सतत हिमवृष्टी सुरू आहे. यामुळे विजेचा आणि मोबाईल नेटवर्कचा पुरवठा खंडित झाला आहे. काही गावांत अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तूंची कमतरता जाणवत आहे.
हेही वाचा - WhatsApp Down: व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवण्यात अडचण, हजारो वापरकर्त्यांनी केली Outage संदर्भात तक्रार
हवामान विभागाने उत्तराखंडच्या देहरादून, उत्तरकाशी, रुद्रप्रयाग, टिहरी, चमोली, पिथोरागड, बागेश्वर, अल्मोडा, नैनिताल आणि चंपावत या भागांमध्ये आज शनिवारी पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच 3 आणि 4 मार्च रोजीही हवामान खराब राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः 2500 मीटर आणि त्यापेक्षा अधिक उंचीच्या भागांमध्ये हलक्या ते मध्यम हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे. यामुळे राज्य प्रशासनाने हिमस्खलनाच्या पार्श्वभूमीवर चमोली, रुद्रप्रयाग, उत्तरकाशी, पिथोरागड आणि बागेश्वर येथे हाय अलर्ट जारी केला आहे.