नवी दिल्ली: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयए न्यायालयाने साध्वी प्रज्ञा ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह सर्व सात आरोपींना निर्दोष ठरवले आहे. या निर्णयावर प्रतिक्रिया देताना भाजप नेत्या उमा भारती यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. ज्या काँग्रेस नेत्यांनी या घटनेला ‘भगवा दहशतवाद’ म्हटले, त्यांनी माफी मागावी, अशी मागणी उमा भारती यांनी केली.
उमा भारती यांनी आरोप केला की, हे षड्यंत्र अशा प्रकारे रचण्यात आले होते की जेणेकरून संपूर्ण हिंदू समाज दहशतवादी घोषित होईल आणि अल्पसंख्याक लोक भीतीपोटी काँग्रेसला मतदान करू लागतील. गेल्या 17 वर्षांपासून आपणही मानसिक छळाच्या तुरुंगात बंदिस्त होतो. पण आज न्यायालयाच्या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे. उमा भारती म्हणाल्या की, आज साध्वी प्रज्ञा, कर्नल पुरोहित आणि इतर सहकाऱ्यांची सुटका ही आपल्या सर्वांची सुटका आहे.
हेही वाचा - ‘हा भगव्याचा विजय...’; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटल्यानंतर साध्वी प्रज्ञा ठाकूर भावुक
उमा भारती म्हणाल्या, साध्वी प्रज्ञा आणि कर्नल पुरोहित यांच्यावर झालेला छळ अमानवी होता. त्यांच्या निर्दोष सुटकेने केवळ त्यांना नव्हे तर संपूर्ण हिंदू समाजाला दिलासा मिळाला आहे. आजचा निकाल म्हणजे सत्याच्या विजयाचा दिवस आहे. तथापी, त्यांनी आरोप केला की, भगवा दहशतवाद हा आरोप लावून काँग्रेसने हिंदूंना आतंकवादी ठरवण्याचा डाव रचला आणि अल्पसंख्यांकांना भीतीदाखवून मते मिळवण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा - 'दहशतवाद कधीच भगवा नव्हता...'; मालेगाव स्फोट प्रकरणातील निकालावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
ओवेसींच्या प्रतिक्रियेवर उमा भारती काय म्हणाल्या?
पुरावे कमकुवत असल्याच्या या निर्णयावर असदुद्दीन ओवेसींच्या प्रतिक्रियेवर उमा भारती म्हणाल्या की, मी असदुद्दीन ओवेसींना सांगेन की जे पुरावे ठेवण्यात आले होते ते कमकुवत करता येणार नाहीत. त्यावेळी काँग्रेस सरकारने ते पुरावे जपून ठेवले होते. त्या पुराव्यांच्या आधारे हा न्यायालयाचा निर्णय आला आहे. उमा भारतींच्या प्रतिक्रियेने मालेगाव प्रकरणातील निकालानंतरचा राजकीय वाद अधिक चिघळण्याची शक्यता आहे. तथापी, काँग्रेसकडून यावर काय उत्तर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.