Thursday, August 21, 2025 02:13:17 AM

डोनाल्ड ट्रम्प यांचं एक पाऊल मागे, टॅरिफच्या यादीतून 'या' वस्तू वगळल्या

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्मार्टफोन, संगणक, लॅपटॉप आणि अन्य महत्त्वाच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंना टॅरिफच्या यादीतून वगळण्याचा निर्णय घेतला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचं एक पाऊल मागे टॅरिफच्या यादीतून या वस्तू वगळल्या

नवी दिल्ली: जगभरातील बाजारपेठांमध्ये खळबळ उडवणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयात शुल्क धोरणात मोठा बदल करण्यात आला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्मार्टफोन, संगणक, लॅपटॉप आणि अन्य महत्त्वाच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंना टॅरिफच्या यादीतून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या वस्तूंवर आता अमेरिकेत आयात शुल्क लागणार नाही. जागतिक व्यापारात निर्माण झालेल्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

यापूर्वी ट्रम्प यांनी रेसिप्रोकल टॅक्स धोरण राबवत, अनेक देशांवर जास्त दराने आयात शुल्क लादले होते. भारतावरदेखील 26 टक्के आयात शुल्क आकारण्यात आले होते. मात्र, याचा फटका अमेरिकन ग्राहकांना बसत असल्याचे स्पष्ट होताच ट्रम्प यांनी काही महत्त्वाच्या वस्तूंना टॅरिफमधून वगळण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या वस्तूंच्या किमतीत घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिकन बाजारपेठेतील महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी हा निर्णय उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

ॲपल, सॅमसंग यांसारख्या आघाडीच्या कंपन्यांनी ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. जर हे टॅरिफ कायम ठेवले गेले असते, तर अमेरिकन बाजारपेठेत या कंपन्यांच्या उत्पादनांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या असत्या. यामुळे ग्राहकांवर आर्थिक भार वाढला असता. मात्र, चीनबाबत ट्रम्प यांची आक्रमक भूमिका कायम आहे. चीनमधून येणाऱ्या वस्तूंवर 145 टक्के कर अद्यापही लागू आहे, तर चीननेही प्रत्युत्तरादाखल 124 टक्के कर अमेरिकन वस्तूंवर लावला आहे.

स्मार्टफोन आणि संगणकसारख्या वस्तूंवर अमेरिकेत उत्पादन क्षमतेचा अभाव असल्यामुळे त्यांना टॅरिफमधून वगळण्यात आले आहे. या वस्तूंसाठी नवीन कारखाने उभारायला अनेक वर्षांचा कालावधी लागेल, असे तज्ञांचे म्हणणे आहे. याशिवाय, सेमीकंडक्टर तयार करणाऱ्या मशिन्सनाही या यादीतून वगळण्यात आले आहे, ज्याचा थेट फायदा तैवानच्या टीएसएमसी कंपनीला होणार आहे. याच कंपनीचा प्लांट भारतातील चेन्नईमध्ये आहे, तर गुजरातमधील सानंदमध्ये नव्या सेमीकंडक्टर युनिटची तयारी सुरू आहे. त्यामुळे भारतालाही या बदलांचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.
 


सम्बन्धित सामग्री