Monday, September 01, 2025 02:36:56 PM

31st Special : दारू पिऊन झिंगल्यावर काळजी नको, पोलीस आता मित्र, तळीरामांना घरी सोडणार

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुख्खू यांनी पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी अनोखा निर्णय घेतला आहे

31st special  दारू पिऊन झिंगल्यावर काळजी नको पोलीस आता मित्र तळीरामांना घरी सोडणार

हिमाचल प्रदेश : थर्टी फर्स्ट म्हटलं की आनंद, सेलिब्रेशन आणि दारूचा मनसोक्त आस्वाद घेणाऱ्या तळीरामांची मज्जाच असते. अनेकदा दारू पिऊन झिंगल्यानंतर पोलिसांचा धाक तळीरामांच्या उत्साहावर विरजण घालतो. मात्र, यंदा हिमाचल प्रदेशच्या शिमल्यातील तळीरामांसाठी मोठी खुशखबर आहे. दारू पिऊन झिंगलात तरीही पोलिस तुमच्यावर रागावणार नाहीत, उलट प्रेमाने घरी पोहोचवतील.

नव्या वर्षाच्या स्वागतासाठी हिमाचल प्रदेशात, विशेषतः शिमल्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटक जमतात. 24 डिसेंबर 2024 ते 2 जानेवारी 2025 या काळात सिमला कार्निव्हल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुख्खू यांनी पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी अनोखा निर्णय घेतला आहे. त्यांनी पोलिसांना स्पष्ट आदेश दिले आहेत की, दारू पिऊन झिंगलेल्या लोकांवर कोणतीही कठोर कारवाई करू नये.

मुख्यमंत्री सुख्खू यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, हिमाचल प्रदेश "अतिथी देवो भवः" ही संस्कृती मानतो. नववर्षाच्या स्वागतासाठी आलेले पर्यटक दारूच्या नशेत असतील, तर पोलिसांनी त्यांना प्रेमाने समजवून त्यांच्या हॉटेलवर सुखरूप पोहोचवावे. कारागृहात डांबण्याऐवजी या अतिथींना आदराने वागवण्याचा आदेश मुख्यमंत्री सुख्खू यांनी दिला आहे.

पर्यटकांना सुरक्षित वाटण्यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे. यामुळे नववर्षाच्या स्वागतात कोणताही अडथळा येणार नाही, तसेच दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या लोकांनाही जबाबदारीची जाणीव करून देण्यात मदत होईल.दारू पिणाऱ्यांसाठी पोलिसांच्या या सकारात्मक वागणुकीमुळे हिमाचल प्रदेशचा पर्यटन व्यवसाय अधिक फुलेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. 


सम्बन्धित सामग्री