नवी दिल्ली: भारताच्या ब्रह्मोस सुपरसॉनिक क्षेपणास्त्राची जादू अनेक देशांना मोहित करत आहे. युएई, सौदी अरेबिया, व्हिएतनाम, इजिप्त आणि इंडोनेशियासारखे देश ते खरेदी करण्यात रस दाखवत आहेत. फिलीपिन्सने ब्रह्मोस खरेदी करण्यासाठी आधीच करार केला आहे आणि या क्षेपणास्त्रांची डिलिव्हरी देखील गेल्या वर्षी सुरू झाली आहे.
ध्वनीच्या वेगापेक्षा तिप्पट वेगाने प्रवास करणारे जगातील एकमेव सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र ब्रह्मोस खरेदी करण्यासाठी इंडोनेशियाची चर्चा अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात आहे. परंतु दुसऱ्या देशाशी चर्चा अंतिम टप्प्यात आहे. एका वृत्तसंस्थेने, संरक्षण क्षेत्राशी संबंधित सूत्रांचा हवाला देऊन असे म्हटले आहे की, हा एक संवेदनशील करार असल्याने, ज्या देशाशी वाटाघाटी अंतिम टप्प्यात पोहोचल्या आहेत. त्याचे नाव गुप्त ठेवण्यात आले आहे.
हेही वाचा - Ayodhya Ram Mandir : मुख्य पुरोहिताला किती वेतन मिळते? जाणून घ्या आचार्य सत्येंद्र दास यांचा पगार
ठळक मुद्दे
- ब्रह्मोस क्षेपणास्त्र खरेदी करण्यास अनेक देश इच्छुक आहेत. त्यांच्यासोबत चर्चाही सुरू आहे.
- फिलीपिन्स हा ब्रह्मोसचा पहिला आंतरराष्ट्रीय ग्राहक आहे. गेल्या वर्षीपासून क्षेपणास्त्राची डिलिव्हरीदेखील सुरू झाली
- भारत आणि रशियाने संयुक्तपणे ब्रह्मोस विकसित केले आहे. त्याचा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा तिप्पट आहे.
- ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या विक्रीसाठी एका देशाशी वाटाघाटी अंतिम टप्प्यात आहेत.
अनेक देशांसोबत ब्रह्मोसविषयी चर्चा सुरू
यूएई, सौदी अरेबिया, इंडोनेशिया, इजिप्त आणि व्हिएतनाम हे देशही ब्रह्मोस क्षेपणास्त्रे खरेदी करण्यासाठी चर्चा करत आहेत. मध्य पूर्वेतील देश या क्षेपणास्त्राच्या जमिनीवरील आवृत्तीमध्ये खूप रस घेत आहेत. सूत्रांनुसार, इंडोनेशियासोबतचा करार अगदी सुरुवातीच्या टप्प्यात आहे. प्रजासत्ताक दिनी इंडोनेशियन राष्ट्राध्यक्ष प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. तेव्हा ब्रह्मोस क्षेपणास्त्र कराराबाबत दोन्ही देशांमधील चर्चेला गती मिळेल, असे मानले जात होते.
गेल्या वर्षी फिलीपिन्सला ब्रह्मोसची डिलिव्हरी सुरू झाली.
भारताने गेल्या वर्षी फिलीपिन्सला ब्राह्मोस क्षेपणास्त्रे देण्यास सुरुवात केली. या क्षेपणास्त्राचा फिलीपिन्स हा पहिला आंतरराष्ट्रीय ग्राहक आहे. हा करार 290 किलोमीटर अंतरावरील अँटी-शिप क्रूझ क्षेपणास्त्राच्या किनारी आवृत्तीसाठी होता.
ब्रह्मोस क्षेपणास्त्र धोकादायक बनवणारी वैशिष्ट्ये
ब्रह्मोस क्षेपणास्त्र भारताने रशियाच्या सहकार्याने विकसित केले आहे. ते ध्वनीच्या वेगापेक्षा तिप्पट वेगाने शत्रूच्या लक्ष्यांवर हल्ला करण्यास सक्षम आहे. हे क्षेपणास्त्र नौदल, लष्कर आणि हवाई दलासाठी खूप प्रभावी आहे. भारताकडे ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या तिन्ही आवृत्त्या आहेत - जमिनीवर, समुद्रात आणि हवेत मारा करू शकणारे. ते जहाजांवरही हल्ला करू शकते. हे भारताच्या डीआरडीओ आणि रशियाच्या एनपीओ मिशिनोस्ट्रोयेनिया यांच्या संयुक्त उपक्रमांतर्गत तयार केले जाते. भारतातील ब्रह्मपुत्रा नदी आणि रशियातील मोस्कवा नदीच्या नावांना एकत्र करून त्याचे नाव तयार केले आहे. हे क्षेपणास्त्र शत्रूच्या रडारला चकवा देण्यास सक्षम आहे.
हेही वाचा - ‘बाबा मलाही पेटवून देतील’... चिमुकल्याचं अंगावर काटा आणणारं बोलणं, गंभीर गुन्हा उघडकीस
एका वृत्तानुसार, ब्रह्मोस विक्री करार खूप मोठा आणि महत्त्वाचा असेल. यामुळे संरक्षण निर्यात क्षेत्रात भारताला एक प्रमुख देश म्हणून पाय रोवता येतील. अहवालानुसार, ज्या ब्रह्मोस क्षेपणास्त्रासाठी करार अंतिम टप्प्यात आहे तो जमिनीवरील आवृत्तीसंदर्भात आहे.
ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या श्रेणीबद्दल बोलायचे झाले तर, त्याची हवाई आवृत्ती 400 ते 500 किलोमीटरपर्यंत मारा करण्यास सक्षम आहे. क्षेपणास्त्रांच्या जमीन आणि समुद्री आवृत्त्यांची मारा करण्याची क्षमता 800 ते 900 किलोमीटर आहे. भारत आता आपली मारा करण्याची क्षमता 1500 किलोमीटरपर्यंत वाढवण्याच्या दिशेने काम करत आहे. ब्रह्मोस क्षेपणास्त्र पृष्ठभागापासून किमान 10 मीटर आणि कमाल 15 किलोमीटर उंचीवरून उड्डाण करून हल्ला करू शकते.