नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या विरोधातील चौकशीप्रकरणी महत्त्वाचा निर्णय दिला आहे. त्यांच्या घरातून जळालेल्या नोटा सापडल्याप्रकरणी सुरू असलेल्या चौकशीविरोधात दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे आता चौकशीची प्रक्रिया थांबणार नाही. न्यायमूर्ती वर्मा यांनी दिल्ली उच्च न्यायालयात कार्यरत असताना त्यांच्या शासकीय निवासस्थानी लागलेल्या आगीसंदर्भात सुरू झालेल्या चौकशीला सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून विरोध केला होता. त्यांचा युक्तिवाद होता की, चौकशी अहवाल राष्ट्रपती व पंतप्रधानांना पाठवणे हे असंवैधानिक होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने युक्तिवाद फेटाळत चौकशीला वैध ठरवले.
रोकड प्रकरणातील तपास प्रक्रियेला आव्हान देणारी न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांची याचिका फेटाळताना, न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती एजी मसीह यांच्या सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने म्हटले की, न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचे वर्तन आत्मविश्वास निर्माण करत नाही, म्हणून त्यांच्या याचिकेचा विचार केला जाऊ नये.
हेही वाचा - Judge Cash Row: उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घराजवळ सापडल्या जळालेल्या नोटा, पहा व्हिडिओ
काय आहे नेमकं प्रकरण?
फेब्रुवारी 2025 मध्ये वर्मा यांच्या घरात लागलेल्या आगीवेळी अग्निशमन विभागाला जळालेली रोकड सापडली होती. त्यानंतर त्यांची बदली अलाहाबाद उच्च न्यायालयात करण्यात आली. या घटनेनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या अंतर्गत चौकशी समितीने चौकशी करून अहवालात दोषी ठरवले आणि तो अहवाल राष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडे पाठवण्यात आला होता. या निर्णयाला न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
हेही वाचा - मोठी बातमी! भारत-अमेरिका व्यापार युद्धादरम्यान पुतिन दिल्ली दौऱ्यावर येणार
कोण आहेत न्यायमूर्ती यशवंत वर्मा?
न्यायमूर्ती यशवंत वर्मा हे भारताचे वरिष्ठ न्यायाधीश असून त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून सेवा बजावली आहे. त्याआधी ते अलाहाबाद उच्च न्यायालयात कार्यरत होते आणि तिथूनच त्यांच्या न्यायालयीन कारकिर्दीची सुरुवात झाली होती. त्यांनी अनेक महत्त्वाच्या घटनात्मक, प्रशासकीय आणि कायदेशीर प्रकरणांवर निर्णय दिले आहेत. त्यांची ओळख एक कठोर पण न्यायप्रिय न्यायाधीश म्हणून होती. मात्र 2025 मध्ये त्यांच्या निवासस्थानी लागलेल्या आगीवेळी मोठ्या प्रमाणात जळालेली रोकड सापडल्याच्या घटनेमुळे ते वादाच्या भोवऱ्यात अडकले.