हैदराबाद: तेलंगणामधील एका केमिकल फॅक्टरीत आज सकाळी मोठा स्फोट झाला. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 26 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला, त्यानंतर कारखान्यात गोंधळ उडाला. अनेक कामगार जीव वाचवण्यासाठी बाहेर पळाले. परंतु जे बाहेर येऊ शकले नाहीत ते गंभीरपणे भाजले. त्यांचा जागीच मृत्यू झाला. कारखान्यातील केमिकल रिअॅक्टरमध्ये स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे, ज्यामुळे कारखान्याला आग लागली.
कारखान्यातून धूर निघत असल्याचे पाहून ग्रामस्थ घटनास्थळी धाव घेतली. पोलिस आणि अग्निशमन दलाच्या 11 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग विझवण्यात आली. जखमींना रुग्णवाहिकेने रुग्णालयात नेण्यात आले. पशामिलाराम येथील सिगाची केमिकल इंडस्ट्रीमध्ये हा स्फोट झाल्याचं सांगण्यात येत आहे.
हेही वाचा - फास्टटॅग वार्षिक पासचं बुकिंग कुठे आणि कसं कराल? जाणून घ्या
दरम्यान, पोलीस, अग्निशमन दल आणि इतर कर्मचाऱ्यांनी बचाव आणि मदत कार्य सुरू केले. प्राप्त माहिीतनुसार, पाच कामगारांचा जागीच मृत्यू झाला तर तिघांचा रुग्णालयात मृत्यू झाला. मडिंगुडा येथील एका खाजगी रुग्णालयात मृतांपैकी दोघांची ओळख अभिषेक कुमार (बिहार) आणि नागरजीत तिवारी (ओडिशा) अशी झाली आहे. स्फोटावेळी कारखान्यात एकूण 66 जण काम करत होते. जखमींना विविध रुग्णालयात हलवण्यात आले आणि त्यापैकी पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा - शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! पुरामुळे पिकांचे नुकसान झाल्यास केंद्र सरकार देणार भरपाई
राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ), हैदराबाद आपत्ती प्रतिसाद आणि मालमत्ता संरक्षण संस्था (हायड्रा), महसूल आणि पोलिस बचाव आणि मदत कार्यात सहभागी होते. प्रत्यक्षदर्शींच्या मते, स्फोट इतका भयानक होता की, यात कामगार हवेत उडून खाली पडले. स्फोटाच्या धक्क्याने कारखान्यातील उत्पादन युनिट कोसळले.