रविवारी 2 मार्च 2025 पासून रोजा (उपवास) ठेवण्यास सुरुवात झाली आहे. सध्या मुस्लिम समाजात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मात्र 9 मार्च रोजी चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना सुरु होणार आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्याकडे आहे. अशातच रमजान महिन्यात रोजा न ठेवता भारतीय क्रिकेटर मोहम्मद शमीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात एनर्जी ड्रिंक घेतले होते. त्यामुळे उत्तर प्रदेशातील बरेलीच्या एका मौलानाने शमीवर निशाणा साधलाय. अशा स्थितीत मोहम्मद शमीचे समर्थन करण्यासाठी त्याचे माजी कोच बदरुद्दीन सिद्दीकी यांनी वक्तव्य केले आहेत. चला तर जाणून घेऊया नेमकं काय म्हणाले शमीचे माजी कोच.
शमीचे माजी कोच म्हणाले:
मंगळवारी झालेल्या भारत-ऑस्ट्रेलिया यांच्या सामन्यावेळी एक फोटो प्रचंड व्हायरल झाला ज्यामध्ये मोहम्मद शमी एनर्जी ड्रिंक घेत होता. हा फोटो प्रचंड व्हायरल झाल्यामुळे उत्तर प्रदेशातील बरेलीच्या एका मौलानाने शमीवर टीका केले. त्यामुळे मौलानाला प्रत्युत्तर देत शमीचे माजी कोच म्हणाले, 'आधी देश येतो. त्याच्यापूर्वी काहीच येत नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना पूर्ण झाल्यानंतरदेखील शमी रोजा करू शकतो'.
जे काही करतोय ते देशासाठी करतोय:
'मोहम्मद शमी जे काही करतोय ते देशासाठी करतोय. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनल्सपूर्वी खेळाडूंना मानसिक त्रास होईल, अशी वक्तव्ये कुणीही करू नयेत', असेदेखील शमीचे माजी कोच बदरुद्दीन सिद्दीकी यांनी वक्तव्य केले.
शमीच्या जवळचे कारी मुनीब म्हणाले:
शमीच्या कुटुंबीयांनी आणि त्याच्या गावातील लोकांनीही शमीला पाठिंबा दिला आहे. शमीच्या जवळचे कारी मुनीब म्हणाले, 'आम्हा सर्वांना त्याचा अभिमान आहे. देशासाठी खेळण्याचे कामही त्याला अल्लाहने दिले आहे. त्यामुळे छोट्या-छोट्या बाबींवर विधाने करणे हे निषेधार्ह आहे. सध्या शमी प्रवास करत आहे. दुबईच्या कडक उन्हात जर त्याने पाणी नाही प्यायले तर तो आजारी पडू शकतो.'
मोहम्मद शमीचा भाऊ म्हणाला:
मोहम्मद शमीचा भाऊ हसीब शमी म्हणाला, 'शमी एक खेळाडू आहे. त्याला जेव्हा सामना खेळायचा असतो तेव्हा तो रोजा ठेवत नाही. कारण गोलंदाजीत खूप मेहनत करावी लागते. यामुळे या परिस्थितीत तो रमजान महिन्यात उपवास करू शकत नाही. सामन्यानंतर तो रोजा ठेवेल.'