मुंबई: क्रिकेटजगतातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. 9 सप्टेंबर 2025 पासून आशिया कप 2025 सुरू होणार आहे. मात्र, आशिया कप 2025 सुरू होण्यापूर्वीच बीसीसीआयला मोठा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी, संसदेने 'ऑनलाइन गेमिंग नियमन विधेयक 2025' मंजूर केल्यानंतर, ड्रीम 11 ने पैशांसंबंधित सर्व प्रकरच्या ऑनलाईन गेम्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ड्रीम 11 कंपनीने घेतलेल्या निर्णयामुळे टीम इंडिया आणि बीसीसीआय यांचा 358 कोटी रुपयांचा करार संकटात आला आहे.
हेही वाचा: Himachal Rain: हिमाचलमध्ये मुसळधार पाऊस, 3 राष्ट्रीय महामार्ग, 400 हून अधिक रस्ते बंद; चंबा येथे ढगफुटी, 5 जिल्ह्यांची स्थिती बिकट
ड्रीम 11 चा 358 कोटींचा करार
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ड्रीम 11 ने 2023 मध्ये बीसीसीआयसह 358 कोटींचा करार केला होता. या कराराप्रमाणे ड्रीम 11 कंपनी प्रत्येक देशातील सामन्यासाठी 3 कोटी रुपये आणि विदेशी सामन्यांसाठी 1 कोटी रुपये देत असे. मात्र, काही दिवसांपूर्वी, संसदेने 'ऑनलाइन गेमिंग नियमन विधेयक 2025' मंजूर केेले, ज्यामुळे, ड्रीम 11 भारतीय संघाचा मुख्य स्पॉन्सर म्हणून करार सुरू ठेवण्यास तयार नाही.
काय म्हणाले देवजीत सैकिया?
यावर, बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, 'आम्ही देशातील कायद्यांचा आदर करतो आणि सरकारच्या नियमांचे पालन करण्यास एकनिष्ठ आहोत. सध्या, बीसीसीआय नव्या स्पॉन्सरच्या शोधात आहे'. दरम्यान, आशिया कप 9 ते 28 सप्टेंबर या कालावधीत यूएईमध्ये खेळला जाईल. आशिया कपचे सामने दुबई आणि अबू धाबी येथे होईल.