Air Defence Weapon System: संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (DRDO) ओडिशाच्या किनाऱ्यावर एकात्मिक हवाई संरक्षण शस्त्र प्रणाली (IADWS) ची पहिली उड्डाण चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. ही चाचणी शनिवारी दुपारी 12:30 वाजता घेण्यात आली. ऑपरेशन सिंदूरच्या साडेतीन महिन्यांनंतर ही महत्त्वाची उड्डाण चाचणी पार पडली.
IADWS म्हणजे काय?
IADWS ही भारतात विकसित केलेली बहुस्तरीय हवाई संरक्षण प्रणाली आहे. यामध्ये सर्व स्वदेशी जलद प्रतिक्रिया पृष्ठभागावरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे, अतिशय कमी पल्ल्याच्या हवाई संरक्षण प्रणाली (VSHORADS) क्षेपणास्त्रे आणि उच्च शक्तीची लेसर आधारित निर्देशित ऊर्जा शस्त्रे (DEW) प्रणाली असते. या प्रणालीमुळे भारताला शत्रूच्या हवाई हल्ल्यांपासून महत्त्वाच्या लष्करी आणि औद्योगिक सुविधांचे संरक्षण करण्याची अधिक क्षमता प्राप्त होणार आहे.
हेही वाचा - Uttar Pradesh: 35 लाखांची मागणी पूर्ण केली नाही म्हणून विवाहितेची हत्या; आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची पथके रवाना
राजनाथ सिंह यांनी केले अभिनंदन
दरम्यान, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDO, सशस्त्र दल आणि उद्योग क्षेत्राचे अभिनंदन करताना म्हटलं आहे की, 'IADWS च्या यशस्वी चाचणीबद्दल मी सर्व संबंधितांचे अभिनंदन करतो. ही अनोखी चाचणी भारताच्या बहुस्तरीय हवाई संरक्षण क्षमतेला सिद्ध करते. तसेच या चाचणीमुळे शत्रूच्या हवाई धोक्यांविरुद्ध आपले संरक्षण अधिक मजबूत होईल.'
हेही वाचा - Mumbai Rain Update: आज मुंबईत हवामान कसे असेल? जाणून घ्या नवीन अपडेट
DRDO च्या या यशस्वी चाचणीमुळे भारताचे स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञान अधिक बळकट झाले आहे. यामुळे केवळ राष्ट्रीय सुरक्षेला मजबुती मिळणार नाही तर भारत जागतिक संरक्षण क्षेत्रात आणखी प्रभावी ठरणार आहे.