Cleanliness Award: स्वच्छतेच्या दिशेने झपाट्याने वाटचाल करणाऱ्या गोव्याने स्वच्छ भारत मिशनअंतर्गत मोठी झेप घेतली आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 मध्ये पणजी शहराने 20,000 ते 50,000 लोकसंख्या गटात ‘देशातील सर्वात स्वच्छ शहर’ म्हणून गौरव मिळवला आहे, तर संखाळी शहराला ‘प्रॉमिसिंग स्वच्छ शहर’ हा मानाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. हा ऐतिहासिक गौरव राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे पार पडलेल्या समारंभात प्रदान करण्यात आला.
या पुरस्कारांनी गोव्यातील शहरी स्वच्छतेबाबतची चळवळ, नागरिकांचा सक्रिय सहभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची निःस्वार्थ मेहनत अधोरेखित केली आहे. हे यश केवळ पुरस्कारापुरते मर्यादित नसून, हे गोव्याच्या प्रगत आणि शाश्वत नागरी विकासाच्या दिशेने टाकलेले आत्मविश्वासाने भरलेले पाऊल आहे.
हेही वाचा:Sugar Withdrawal: साखर खाणं बंद करणार आहात? थांबा! हे 5 गंभीर दुष्परिणाम आधी वाचा…नाहीतर पश्चात्ताप होईल
या गौरवाबद्दल आनंद व्यक्त करत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, 'हे यश प्रत्येक गोमंतकवासीयाचं आहे. पणजी आणि संखाळीतील नागरिक, अधिकारी व सफाई कर्मचारी यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. स्वच्छ भारत हे केवळ अभियान नाही, ती एक राष्ट्रीय चळवळ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या प्रेरणादायी नेतृत्वामुळेच आज गोवा देशाच्या स्वच्छतेच्या नकाशावर ठळकपणे उभा आहे.'
गोव्याच्या या यशाने स्वच्छतेच्या चळवळीत नवचैतन्य आणले आहे आणि इतर राज्यांनाही प्रेरणा दिली आहे. हा पुरस्कार म्हणजे गोव्याचा स्वच्छ, सुंदर आणि शाश्वत भविष्यासाठी घेतलेला दृढ संकल्प आहे.