Wednesday, August 20, 2025 02:00:02 PM

झारखंडमधील बोकारोच्या जंगलात चकमक: 8 नक्षलवादी ठार, मोठा शस्त्रसाठा हस्तगत

झारखंडच्या बोकारो जिल्ह्यात सुरक्षा दलांनी 8 नक्षलवाद्यांचा खात्मा केला. 1 कोटींचं बक्षीस असलेला विवेक ठार, अनेक शस्त्रास्त्रे जप्त.

झारखंडमधील बोकारोच्या जंगलात चकमक 8 नक्षलवादी ठार मोठा शस्त्रसाठा हस्तगत

झारखंड: झारखंडमधील बोकारो जिल्ह्यात सोमवारी सकाळी सुरक्षा दलांनी मोठं यश मिळवलं. लुगू आणि झुमरा टेकड्यांच्या दरम्यानच्या जंगलात झालेल्या चकमकीत 8 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. या कारवाईत 1 कोटी रुपयांचे बक्षीस असलेला नक्षलवादी विवेक देखील ठार झाला आहे. त्याच्यासह अनेक शस्त्रे आणि देशी बनावटीच्या रायफल्स जप्त करण्यात आल्या आहेत.

झारखंडचे पोलीस महासंचालक (DGP) यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही चकमक सोमवारी पहाटे 5.30 वाजता सुरू झाली आणि सुमारे अडीच तास सुरू होती. सीआरपीएफच्या 209 कोब्रा बटालियन आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त कारवाईदरम्यान ही चकमक घडली. चकमकीनंतर घटनास्थळी तपास सुरू असून आतापर्यंत 8 नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. उर्वरित नक्षलवाद्यांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे.

गुप्त माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी शोध मोहीम सुरू केली होती. शोध मोहीम सुरू असताना नक्षलवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल जवानांनीही जोरदार कारवाई करत आठ नक्षलवाद्यांचा खात्मा केला. मिळालेल्या माहितीनुसार, चकमकीदरम्यान कोणताही सुरक्षा कर्मचारी जखमी झालेला नाही.

हेही वाचा :पुण्यात झिपलायनिंग करताना भीषण दुर्घटना: ३० फूट उंचीवरून पडून 28 वर्षीय तरुणीचा मृत्यू

सुरक्षा दलांनी घटनास्थळावरून दोन इन्सास रायफल्स, एक एसएलआर, एक पिस्तूल आणि आठ देशी बनावटीच्या रायफल्स जप्त केल्या आहेत. या शस्त्रांमधून नक्षलवाद्यांची तयारी आणि त्यांचा बेकायदेशीर साठा स्पष्ट होतो. सध्या परिसरात शोध मोहीम सुरू असून अजूनही काही नक्षलवादी जंगलात लपले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लुगू आणि झुमरा टेकड्यांमधील जंगल क्षेत्र हे नक्षलवाद्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थान म्हणून ओळखले जात होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून या भागात सुरक्षा दलांनी जोरदार मोहीम राबवली आहे. या भागात कोब्रा बटालियन सतत गस्त घालत असून जंगल युद्धात तज्ज्ञ असलेल्या या तुकडीने या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.

संपूर्ण ऑपरेशननंतर स्थानिक पोलिसांनी परिसरात सतर्कता वाढवली असून प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. झारखंडमधील नक्षलविरोधी लढ्यात ही कारवाई मोठं टर्निंग पॉइंट मानली जात आहे.


सम्बन्धित सामग्री