गडचिरोली : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2025 च्या नववर्षाच्या पहिल्याच दिवशी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात, मुख्यमंत्री गडचिरोलीच्या मागास आणि नक्षल प्रभावित भागातील विविध विकासकामांची सुरूवात करणार आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गट्टा-वांगेतुरी भागात रस्त्याचे आणि नव्या पुलाचे लोकार्पण होणार आहे. याचसह, बससेवेचे उद्घाटनही केले जाईल, ज्यामुळे येथील नागरिकांना परिवहन सुविधांची मोठी सोय होईल. मुख्यमंत्री या दौऱ्यात गडचिरोली पोलीस मुख्यालयात पोलीस आणि सुरक्षा दलाच्या जवानांसोबत संवाद साधणार आहेत. दुपारी एक वाजता, मुख्यमंत्री कोनसरी येथे लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेडच्या पोलाद प्रकल्पाच्या नव्या टप्प्याचे लोकार्पण करणार आहेत. गडचिरोलीमध्ये हा पहिलाच मोठा उद्योग मानला जातो, जो या जिल्ह्यातील औद्योगिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा ठरेल.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे गडचिरोली पोलिस मुख्यालयात काही माओवादी कमांडर कायद्यासमोर शरणागती पत्करणार आहेत. यामुळे या भागात शांतता आणि सुरक्षा प्रस्थापित करण्यासाठी मदत होईल. मुख्यमंत्र्यांचा गडचिरोली दौरा नववर्षाची सुरुवात विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरेल, जो मागासलेल्या भागांना प्रगतीच्या दिशेने नेण्याचे कार्य सरकारच्या माध्यमातून होईल अशी अपेक्षा आहे.