नवी दिल्ली: दरवर्षी 15 ऑगस्ट म्हणजेच भारताचा स्वातंत्र्यदिन आला, की देशभरातील नजरा दिल्लीतील लाल किल्ल्याकडे वळतात. पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण आणि त्यानंतरचं भाषण हे प्रत्येक भारतीयासाठी उत्सुकतेचा विषय असतो. पंतप्रधानांच्या भाषणातील प्रत्येक ओळ, प्रत्येक मुद्दा, एखाद्या मोठ्या धोरणाचा किंवा जनतेशी जोडलेल्या विषयाचा हिस्सा असेल, अशी अपेक्षा असते. पण यंदा, 79 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण आणखी खास ठरणार आहे. कारण, यंदाचं भाषण देशातील जनतेनेच लिहिलेलं असणार आहे.
पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट शेअर करत, नागरिकांकडून त्यांच्या भाषणासाठी थेट सूचना मागवल्या आहेत. पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे 'तुमचे विचार ऐकायला उत्सुक आहे. या वर्षीच्या स्वातंत्र्यदिनाजवळ येत असताना, मी माझ्या भारतीयांकडून ऐकण्यास उत्सुक आहे. या वर्षीच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात तुम्हाला कोणते विषय किंवा कल्पना प्रतिबिंबित होताना पहायला आवडेल?'
सुचना कशा द्यायच्या?
पंतप्रधानांनी त्यांच्या पोस्टमध्ये MyGov आणि NaMo अॅपच्या लिंक शेअर केल्या आहेत. या व्यासपीठांवर नागरिकांना आपले विचार मांडता येतील. 30 जुलैपासून या फोरमवर प्रतिसाद देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तथापी, 12 ऑगस्टपर्यंत नागरिकांना सूचना देता येतील. या माध्यमातून देशातील कोणताही नागरिक पंतप्रधानांपर्यंत आपले मत पोहोचवू शकतो. यामध्ये कोणतेही वयोगटाचे किंवा क्षेत्राचे बंधन नाही. शेती, शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, रोजगार, डिजिटल इंडिया, स्टार्टअप्स यांसारख्या कोणत्याही विषयावर आपली मते मांडता येतात.
हेही वाचा - पंतप्रधान मोदींनी जारी केले 1000 रुपयांचे नाणे; काय आहेत त्याची वैशिष्ट्ये? जाणून घ्या
जनतेशी संवाद मोदींची खास शैली
पंतप्रधान मोदींचं जनतेशी थेट संवाद साधण्याचं नवं पाऊल वाटत असलं, तरी ही त्यांची नियमित शैलीच आहे. यापूर्वीही अनेकदा त्यांनी 'मन की बात' सारख्या कार्यक्रमांमध्ये जनतेकडून सूचना मागवून त्या आपल्या भाषणात समाविष्ट केल्या आहेत. 30 मार्च रोजी झालेल्या 'मन की बात' कार्यक्रमासाठी देखील त्यांनी जनतेकडून सूचना मागविल्या होत्या. हा कार्यक्रम हिंदीसह अनेक प्रादेशिक भाषांमध्ये आकाशवाणीवर प्रसारित करण्यात आला होता, ज्यामुळे प्रत्येक प्रांतातील नागरिकांपर्यंत सरकारचा संवाद पोहोचला.
हेही वाचा - PM Kisan Yojana: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता 'या' तारखेला वितरित होणार
सरकारची लोकाभिमुख दिशा
पंतप्रधान मोदींचा हा उपक्रम म्हणजे केवळ एक राजकीय स्टंट नाही, तर लोकशाहीच्या मूळ तत्त्वांशी जोडलेली एक पायरी आहे. 15 ऑगस्ट 2025 रोजी जेव्हा पंतप्रधान लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करतील, तेव्हा त्या भाषणात सामान्य नागरिकांचे विचार, त्यांचे मुद्दे, आणि त्यांची आशा-अपेक्षा यांचा ठसा उमटलेला असेल.