नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी दोन्ही देशांमध्ये युद्धबंदीची घोषणा करण्यात आली. अशा परिस्थितीत, युद्धबंदीनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे पहिले विधान समोर आले आहे. 'पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला असून ज्यांनी सिंदूर पुसला त्यांच्यावर सूड उगवला,' अशी प्रतिक्रिया राजनाथ सिंह यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लखनौमध्ये ब्रह्मोस इंटिग्रेशन अँड टेस्टिंग फॅसिलिटी सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमात दिली.
राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे की, 'भारताचा धोका पाकिस्तानी लष्कराच्या मुख्यालयापर्यंतही पोहोचला आहे. आम्ही पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. पाकिस्तानात घुसून अनेक हल्ले केले. आपण ज्या परिस्थितीतून जात आहोत त्यामुळे मी लखनौला येऊ शकलो नाही. आजचा दिवस खूप खास आहे. 1998 मध्ये आजच्याच दिवशी भारताने पोखरणमध्ये आपली ताकद दाखवली. हा प्रकल्प चाळीस महिन्यांत पूर्ण झाला. सध्याच्या परिस्थितीत वेळेवर काम करणे आवश्यक आहे. दहशतवादी हल्ले करून आपल्या बहिणींचे सिंदूर पुसून टाकणाऱ्या दहशतवाद्यांना ऑपरेशन सिंदूरने उत्तर दिले.'
हेही वाचा - 'ब्राह्मोस क्षेपणास्त्राची ताकद पाकिस्तानी लोकांना विचारा...'; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे वक्तव्य
भारताने पाकिस्तानी नागरिकांना लक्ष्य केले नाही -
आम्ही कधीही त्यांच्या नागरिकांना लक्ष्य केले नाही. भारतातील दहशतवादी घटनांचे काय परिणाम होतात हे संपूर्ण जग पाहत आहे. हा दहशतवादाविरुद्धचा नवा भारत आहे. सीमेच्या दोन्ही बाजूंनी कडक कारवाई केली जाईल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत. जो कोणी भारतात दहशतवादी हल्ले करेल, त्याला सीमेपलीकडील जमीनही संरक्षण देऊ शकणार नाही. भारत दहशतवादाला कसा मारतो हे संपूर्ण जगाने पाहिले आहे, असंही राजनाथ सिंह यांनी यावेळी नमूद केलं.
हेही वाचा - चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांची अजित डोवालांसोबत फोनवर चर्चा
ऑपरेशन सिंदूरचा उद्देश -
दरम्यान, राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे की, पाकिस्तानमधील दहशतवादी पायाभूत सुविधा उद्ध्वस्त करण्याच्या उद्देशाने भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर सुरू केले होते. आम्ही त्यांच्या नागरिकांना कधीही लक्ष्य केले नाही, परंतु पाकिस्तानने केवळ भारतीय नागरिकांनाच लक्ष्य केले नाही तर मंदिरे, चर्च, गुरुद्वारांवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. भारतीय सैन्याने धैर्य आणि शौर्यासोबत संयम दाखवला. आम्ही केवळ सीमेवर बांधलेल्या लष्करी तळांवर कारवाई केली नाही तर भारतीय लष्कराचा धोका रावळपिंडीपर्यंत पोहोचला, असंही राजनाथ सिंह यांनी यावेळी सांगितलं.