उत्तर प्रदेशात मशिदींवर धुळवडीच्या रंगांचा शिडकावा झाल्याने वाद उफाळला असताना, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणावर सडेतोड प्रतिक्रिया दिली आहे. 'मोहर्रमच्या जुलूसातील झेंडा मंदिरावर किंवा हिंदू घरांवर पडतो, मग ती घरे अपवित्र होतात का?' असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
'100 हिंदू कुटुंबांत एक मुस्लीम सुरक्षित, पण उलट परिस्थितीत?'
एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, '100 हिंदू कुटुंब असलेल्या परिसरात एक मुस्लीम कुटुंब सुरक्षित राहते आणि त्यांना त्यांच्या धार्मिक प्रथा पाळण्याचे स्वातंत्र्य असते. पण जर 100 मुस्लीम कुटुंबांच्या भागात 50 हिंदू असतील, तर ते सुरक्षित राहू शकतात का?' असा सवाल त्यांनी केला. “बांगलादेश आणि पाकिस्तान याचीच उदाहरणे आहेत,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा: 'गद्दार' गाणाऱ्या कुणाल कामराला जागतिक पाठिंबा – दोन दिवसांत 4 कोटींची मदत!
धुळवड साजरी करताना मशिदींवर रंग उडाल्याने निर्माण झालेल्या वादावर भाष्य करताना योगी आदित्यनाथ म्हणाले, 'रंग उडाला, तर कुणाचे अस्तित्व संपत नाही. ज्यांना रंगांचा तिटकारा आहे, त्यांनी दूर राहावे. प्रशासनाने रंग साफ करण्याचे काम सुरू केले आहे, मग इतका गोंधळ कशाला?'
त्यांनी पुढे मुस्लिम समाजाच्या प्रतिक्रियांवर टीका करत म्हटले, 'ते रंगीबेरंगी कपडे घालतात, मग रंग उडाला तर आक्षेप का? इतके दुटप्पी आचरण कशाला? अनेक मुस्लिम देखील रंग खेळतात, शाहजहापूरमध्ये नवाब साहेबांची यात्रा निघते, मग हा विरोध का?' मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे चर्चेला नवा रंग चढला असून, त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.