PM Modi Retirement: पंतप्रधान नरेंद्र मोदी सप्टेंबर 2025 मध्ये 75 वर्षांचे होतील. त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या निवृत्तीबद्दल चर्चा सुरू झाली आहे. रविवारी पंतप्रधान मोदी अनेक वर्षांनी नागपूर येथील आरएसएस कार्यालयात पोहोचले. त्यानंतर यासंदर्भात चर्चांना उधाण आले. तथापि, शिवसेना (यूबीटी) नेते संजय राऊत यांनी सोमवारी दावा केला की पंतप्रधान नरेंद्र मोदी निवृत्त होणार आहेत.
संजय राऊत यांचा दावा -
शिवसेना नेते संजय राऊत यांनी दावा केला की, पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रातील नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात जाऊन निवृत्तीची घोषणा केली. यासोबतच त्यांनी पंतप्रधान मोदींच्या उत्तराधिकाऱ्यांबद्दलही प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर देशभरात मोदींच्या उत्तराधिकाऱ्यांबद्दल चर्चा रंगल्या. संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी सप्टेंबर 2025 मध्ये 75 वर्षांचे होतील. त्यानंतर ते निवृत्त होतील. पंतप्रधान झाल्यानंतर 11 वर्षांनी नरेंद्र मोदी पहिल्यांदाच आरएसएस मुख्यालयाला भेट दिली आहे. तिथली भेट त्यांच्या निवृत्तीबद्दल चर्चा करण्यासाठी असू शकते.'
हेही वाचा - पंतप्रधान मोदींच्या छत्तीसगड दौऱ्यापूर्वी नक्षलवादाविरोधात मोठे यश! विजापूरमध्ये 50 नक्षलवाद्यांनी केलं आत्मसमर्पण
संजय राऊत यांनी फेटाळून लावला देवेंद्र फडणवीस यांचा दावा -
संजय रावत यांनी असा दावाही केला की, संघात असे धोरण आहे की नेते 75 वर्षांचे झाल्यानंतर निवृत्त होतात. हे एक अघोषित धोरण आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींनाही आता निवृत्ती घ्यावी लागेल. तथापि, संजय रावत यांचा हा दावा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावला. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी अनेक वर्षे देशाचे नेतृत्व करत राहतील आणि 2029 मध्ये ते पुन्हा पंतप्रधान होताना दिसतील. उत्तराधिकाऱ्यांबद्दल बोलणे आताच घाईचे ठरेल. यासाठी त्यांनी भारतीय संस्कृतीचा युक्तिवाद दिला आणि सांगितले की जोपर्यंत वडील जिवंत आहेत तोपर्यंत उत्तराधिकारीच्या नावाची चर्चा होत नाही.
हेही वाचा - Personal Secretary of PM Modi: निधी तिवारी बनल्या पंतप्रधान मोदींच्या खाजगी सचिव; काय असतील त्यांच्या जबाबदाऱ्या? जाणून घ्या
भाजपचं धोरण काय आहे?
भाजप नेते लालकृष्ण अडवाणी, सुमित्रा महाजन आणि मुरली मनोहर जोशी यांसारख्या नेत्यांनीही वयाच्या 75 व्या वर्षानंतर राजकारणातून निवृत्ती घेतली होती. त्यांना तिकीट देण्यात आले नाही. मे 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यानही, पंतप्रधान मोदी 75 वर्षांचे झाल्यानंतर निवृत्त होतील, अशा अनेक अफवा पसरवल्या गेल्या होत्या. तथापि, अमित शहा आणि राजनाथ सिंह यांनी अशा अफवांचे खंडन केले होते.