8th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी या वर्षीची दिवाळी अधिक खास ठरण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार लवकरच महागाई भत्त्यात (DA) वाढ करण्याबरोबरच आठवा वेतन आयोग स्थापन करण्याचा निर्णय जाहीर करू शकते, अशी माहिती समोर आली आहे. या दोन महत्त्वाच्या निर्णयांमुळे देशभरातील सुमारे 1.2 कोटी कर्मचारी आणि निवृत्तांना थेट फायदा होऊ शकतो.
अहवालांनुसार, जुलै ते डिसेंबर 2025 या कालावधीसाठी डीएमध्ये 3 टक्के वाढ होण्याची दाट शक्यता आहे. सध्या 55 टक्के महागाई भत्ता दिला जातो, जो 58 टक्केवर जाण्याची शक्यता आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार तसेच पेन्शनधारकांचे मासिक उत्पन्न वाढेल आणि सणासुदीच्या काळात त्यांच्या हातात अतिरिक्त रक्कम उपलब्ध होईल.
हेही वाचा - Anil Ambani : अनिल अंबानी आणि राणा कपूर यांच्या अडचणी वाढल्या, सीबीआयने दाखल केले आरोपपत्र
याआधी, मार्च 2025 मध्ये केंद्र सरकारने डीएमध्ये 2 टक्के वाढ केली होती. तो 53 टक्के वरून 55 टक्के करण्यात आला होता. यावेळी होणारी 3 टक्के वाढ दिवाळीपूर्वी आर्थिक दिलासा देणारी ठरेल. उदाहरणार्थ, एखाद्या निवृत्त व्यक्तीचे मूळ पेन्शन 9,000 असेल, तर 55 टक्के डीएवर त्यांना एकूण 13,950 मिळतात. डीए 58 टक्के झाल्यास त्यांचे पेन्शन 14,220 पर्यंत जाईल, म्हणजेच दरमहा 270 ची अतिरिक्त वाढ मिळेल.
हेही वाचा - EPFO Passbook Lite : पीएफ बॅलन्स तपासणे झाले आणखी सोपे; EPFO ने दिला नवा पर्याय
दरम्यान, 16 जानेवारी 2025 रोजी केंद्र सरकारने आठवा वेतन आयोग स्थापन होणार असल्याचे संकेत दिले होते. सूत्रांच्या माहितीनुसार, दिवाळीपूर्वी आयोगाच्या संदर्भ अटी (TOR) निश्चित करून 6 सदस्यीय आयोग कार्यरत होऊ शकतो. आयोगाला 15-18 महिन्यांत अहवाल सादर करण्याची जबाबदारी सोपवली जाणार असून, 1 जानेवारी 2026 पासून नव्या शिफारसी लागू होण्याची शक्यता वर्तवली जाते. या संभाव्य निर्णयांमुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये आणि पेन्शनधारकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली असून, दिवाळीपूर्वी सरकारच्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.