बारामती : मतमोजजणीला सुरुवात झाली आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार टपालाची मते मोजण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. टपालातून आलेल्या मतांची मोजणी सुरू झाल्यापासून युगेंद्र पवार आघाडीवर आणि अजित पवार पिछाडीवर आहेत. अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत तर युगेंद्र पवार हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत.
शरद पवार खासदार झाल्यानंतर अजित पवार पहिल्यांदा आमदार झाले. अजित पवार १९९१ पासून बारामतीचे आमदार आहेत. सलग तीन दशकांपासून बारामती मतदारसंघाचे नेतृत्व करणारे अजित पवार टपाली मतदानात पिछाडीवर पडले आहे.
अजित पवार हे शरद पवारांचे पुतणे आहेत. बहुसंख्य आमदारांना सोबत घेऊन महायुतीसोबत जाण्याचा निर्णय अजित पवारांनी घेतला. यानंतर शरद पवारांनी बारामतीत अजित पवारांच्या विरोधात युगेंद्र पवारांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे. युगेंद्र हे अजित पवारांचे पुतणे आहेत. यामुळे बारामतीत काका - पुतण्याच्या लढाईत कोण जिंकणार याची उत्सुकता वाढली आहे.