बारामती : बारामतीत अजित पवारांचे समर्थक आणि युगेंद्र पवारांच्या मातोश्री शर्मिला पवार यांचे समर्थक यांच्यात बाचाबाची झाली. याप्रसंगी अजित पवारांच्या समर्थकांकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप शर्मिला पवारांच्या समर्थकांनी केला. पोलिसांनी हस्तक्षेप करुन परिस्थिती नियंत्रणात आणली.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून बारामतीत अजित पवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. अजित पवार मागील मागील तीन दशकांपेक्षा अधिक काळापासून बारामतीचे आमदार आहेत. यावेळी त्यांच्या विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून युगेंद्र पवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. युगेंद्र पवार हे अजित पवारांचे पुतणे आहेत. यामुळे यंदा कोण जिंकणार याबाबत उत्सुकता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर बारामतीत मतदानावेळी अजित पवारांचे समर्थक आणि युगेंद्र पवारांच्या मातोश्री शर्मिला पवार यांचे समर्थक यांच्यात बाचाबाची झाली.
मतदानावेळी तर्जनीला शाई लावली जाते. मतदार तर्जनीला शाई लावून घेतली आणि मतदान झाले की अनेकदा बाहेर येऊन अभिमानाने तर्जनी मिरवणे पसंत करतात. पण या प्रकारावरुन मतभेद झाले. तर्जनी दाखवून पहिल्या क्रमांकाचे उमेदवार असलेल्या अजित पवारांनाच मतदान करण्याचे आवाहन केले जात असल्याचा आरोप शर्मिला पवारांच्या समर्थकांनी केला. हा आरोप सुरू झाला त्यावेळी मतदान केंद्राच्या परिसरात उभ्या असलेल्या अजित पवारांच्या समर्थकांनी आरोप फेटाळला. मतदान केंद्रावर तर्जनी दाखवण्यावरुन वादावादी झाली आणि अजित पवारांच्या समर्थकाने धमकी दिली; असा गंभीर आरोप शर्मिला पवारांच्या समर्थकांनी केला. तर शर्मिला पवारांच्या समर्थकांचा आरोप अजित पवारांच्या समर्थकांनी फेटाळला.
बारामतीत 33.78 टक्के मतदान
बारामती विधानसभा मतदारसंघात दुपारी एक वाजेपर्यंत 33.78 टक्के मतदान झाले. मतदान संध्याकाळी सहापर्यंत आहे. अनेकदा संध्याकाळी सर्व कामं आटोपून मतदार मतदान केंद्रावर गर्दी करतात. यामुळे संध्याकाळपर्यंत बारामतीतली मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.