मुंबई : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 66.05 टक्के मतदान झाले. या निवडणुकीसाठी प्रचार करत असताना अनेक नेत्यांनी दिलेल्या घोषणांवरुन वाद झाले. या वादाला कारण ठरलेल्या घोषणांबाबत निवडणूक आयोगाने अहवाल तयार केला आहे. राज्यातील निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी तयार केलेला हा अहवाल दिल्लीत आयोगाच्या मुख्यालयात पाठवण्यात आला आहे. अहवालाचा अभ्यास करुन निवडणूक आयुक्त वादाचे कारण ठरलेल्या घोषणांप्रकरणी कोणावर काय कारवाई करावी याबाबतचे निर्णय घेणार आहेत.
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी वक्फ बोर्डाचे प्रतिनिधी, मुसलमान धर्मगुरु यांच्याशी चर्चा केली. विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार सुरू असताना ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाच्या सज्जाद नोमानी यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. 'एक ऐसा व्होट जिहाद करो... जिसके सिपेसालार है : शरद पवार.. अझीम सिफाही है : उद्धव ठाकरे, राहुल गांधी, नानाजी पटोले और हमारा निशाना महाराष्ट्र नही...तो दिल्ली है...' असे नोमानींचे व्हिडीओतले वक्तव्य व्हायरल होताच मविआ आणि महायुती यांच्यात शाब्दिक चकमक सुरू झाली. ही चकमक भाषणांतून, प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना तसेच समाजमाध्यमातून व्यक्त होताना नेत्यांच्या पोस्टमधून जाहीर होऊ लागली.
विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार सुरू झाल्यानंतर पंतप्रधान आणि भाजपाचे मुख्य स्टार प्रचारक नरेंद्र मोदी यांनी 'एक रहेंगे तो सेफ रहेंगे' अशी घोषणा दिली. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजपाचे स्टार प्रचारक योगी आदित्यनाथ यांनी 'बंटेंगे तो कटेंगे' अशी घोषणा दिली. महायुतीच्या प्रामुख्याने भाजपा आणि शिवसेनेच्या नेत्यांनी आणि उमेदवारांनी 'एक रहेंगे तो सेफ रहेंगे' आणि 'बंटेंगे तो कटेंगे' या दोन घोषणांचा वेगवेगळ्या मतदारसंघांचा अंदाज घेत सोयीनुसार पुनरुच्चार केला.
निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेनुसार धर्म, जात यांच्या आधारे प्रचार करता येत नाही. तसेच धर्म, जात या निकषांवर मत मागता येत नाही. विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार करत असताना कोणी आचारसंहितेच्या या नियमाचे उल्लंघन केले की नाही याची तपासणी निवडणूक अधिकाऱ्यांनी अनेकांची वक्तव्यं ऐकून आणि नेते तसेच उमेदवार यांच्या वर्तनाची माहिती घेऊन सविस्तर अहवाल तयार केला आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांचा हा अहवाल दिल्लीत निवडणूक आयोगाच्या मुख्यालयाला पाठवला आहे.