नवी दिल्ली : WWE फाइटर द ग्रेट खली आपल्या विशाल शरीरयष्टी आणि दमदार रिंग परफॉर्मन्ससाठी ओळखले जातात. त्यांनी अंडरटेकर, जॉन सिना आणि रोमन रेंस यांसारख्या दिग्गजांशी लढून भारताचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवलं. खली नेहमीच आपल्या सोशल मीडियावर सक्रिय असतात आणि चाहत्यांसोबत नवीन व्हिडिओ शेअर करतात. याच दरम्यान त्यांनी एक खास व्हिडिओ पोस्ट केला आहे, जो प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.
या व्हिडिओमध्ये खलीसोबत 17 वर्षीय करण सिंग दिसतो, जो मेरठचा रहिवासी आहे. करणची उंची तब्बल 8.2 फूट आहे, तर खलीची उंची 7.1 फूट आहे. दोघे एकत्र उभे असताना खलीसारखा महाकाय व्यक्तीही लहान वाटतो. हा क्षण पाहून लोक अचंबित झाले असून, सोशल मीडियावर या व्हिडिओवर चाहत्यांच्या हजारो प्रतिक्रिया उमटत आहेत.
हेही वाचा : Looking For Indian Husband : 'भारतीय नवराच हवा'; न्यूयॉर्कच्या 'टाईम्स स्क्वेअर'वर तरुणीची अनोखी जाहिरात
खलीने आपल्या अकॅडमीमध्ये करणची ओळख करून देताना म्हटलं, “आयुष्यात पहिल्यांदा माझ्यापेक्षा उंच माणूस पाहिला.” त्यांनी पुढे सांगितलं की, करणला WWE चं भविष्य बनवण्यासाठी मी त्याला सर्वतोपरी मदत करेन. या विधानानंतर करणचं नाव अधिक चर्चेत आलं आहे.
करणच्या आयुष्यातील सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे वयाच्या फक्त आठव्या वर्षी त्याने जगातील सर्वात उंच मुलाचा विक्रम आपल्या नावावर केला होता. त्यानंतर त्याची उंची सतत चर्चेत राहिली आहे. आता मात्र त्याचं ध्येय WWE सुपरस्टार बनण्याचं आहे. द ग्रेट खली यांनी रेसलिंगसोबतच सिनेसृष्टीतही नाव कमावलं आहे. त्यांनी द लॉन्गेस्ट यार्ड, गेट स्मार्ट, मॅकग्रुबर, रामा: द सेविअर अशा हॉलिवूड चित्रपटांमध्ये आणि कुश्ती या बॉलिवूड चित्रपटात काम केलं आहे. खलीप्रमाणेच करण सिंगलाही भविष्यात जागतिक स्तरावर नाव मिळवायचं आहे.