हैदराबाद : भारताने बांगलादेश विरुद्धचे सर्व सामने जिंकत निर्भेळ यश मिळले. भारतीय संघाने बांगलादेश विरुद्धची कसोटी सामन्यांची मालिका २ - ० अशी आणि वीस वीस षटकांची मालिका ३ - ० अशी जिंकली. हैदराबाद येथे झालेल्या बांगलादेश विरुद्धच्या तिसऱ्या वीस वीस षटकांच्या सामन्यात भारताने विक्रमी कामगिरी केली. संजू सॅमसनच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने वीस षटकांत सहा बाद २९७ धावा केल्या. ही वीस वीस षटकांच्या क्रिकेटमधली भारताची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. धावांचा पाठलाग करणाऱ्या बांगलादेशने वीस षटकांत सात बाद १६४ धावा केल्या. भारताचे सामना १३३ धावांनी जिंकला. शतकवीर संजू सॅमसन सामनावीर झाला. हार्दिक पांड्या मालिकावीर झाला. हार्दिकने मालिकेत फलंदाजी आणि गोलंदाजीच्या माध्यमातून प्रभावी कामगिरी केली.
भारत विरुद्ध बांगलादेश
- पहिली कसोटी - चेन्नई - भारताचा २८० धावांनी विजय - सामनावीर आर. अश्विन
- दुसरी कसोटी - कानपूर - भारताचा सात गडी राखून विजय - सामनावीर यशस्वी जयस्वाल आणि मालिकावीर आर. अश्विन
- पहिली T20 - ग्वाल्हेर - भारताचा सात गडी राखून विजय - सामनावीर अर्शदीप सिंह
- दुसरी T20 - दिल्ली - भारताचा ८६ धावांनी विजय - सामनावीर नितीश रेड्डी
- तिसरी T20 - हैदराबाद - भारताचा १३३ धावांनी विजय - सामनावीर संजू सॅमसन आणि मालिकावीर हार्दिक पांड्या
भारताची विक्रमी कामगिरी
भारताने वीस षटकांत सहा बाद २९७ धावा केल्या. ही वीस वीस षटकांच्या क्रिकेटमधली भारताची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. भारताने पावरप्लेमध्ये एक बाद ८२ धावा केल्या. ही भारताची पावरप्लेमधील सर्वोत्तम कामगिरी आहे. भारतीय संघाने ४३ चेंडूत १०० धावा केल्या. क्रिकेटमध्ये वीस वीस षटकांच्या प्रकारात भारताने १०० धावा करण्यासाठी पहिल्यांदाच एवढे कमी चेंडू घेतले आहेत. या सामन्यात भारताने पहिल्या दहा षटकांत एक बाद १५२ धावा केल्या. ही भारताची वीस वीस षटकांच्या प्रकारातील पहिल्या दहा षटकांमधील सर्वोत्तम कामगिरी आहे. भारताने ८४ चेंडूत २०० धावा केल्या. क्रिकेटमध्ये वीस वीस षटकांच्या प्रकारात भारताने २०० धावा करण्यासाठी पहिल्यांदाच एवढे कमी चेंडू घेतले आहेत. भारतीय फलंदाजांनी बांगलादेश विरुद्ध खेळताना २२ षटकार मारले. ही भारतीय फलंदाजांची वीस वीस षटकांच्या प्रकारातील एका डावातल्या षटकारांबाबतची सर्वोत्तम कामगिरी आहे.
संजू सॅमसनची अप्रतिम कामगिरी
भारताचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन याने ४७ चेंडूत १११ धावा केल्या. शतकी खेळी करणाऱ्या संजूने आठ षटकार आणि अकरा चौकार मारले. सुर्यकुमार यादवने ३५ चेंडूत ७५ धावा करताना पाच षटकार आणि आठ चौकार मारले. रियान परागने १३ चेंडूत ३४ धावा करताना चार षटकार आणि एक चौकार अशी फटकेबाजी केली. हार्दिक पांड्याने १८ चेंडूत ४७ धावा करताना प्रत्येकी चार षटकार आणि चौकार मारले. रिंकूने चार चेंडूत नाबाद आठ धावा करताना एक षटकार मारला.