NISAR Mission: भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आणि अमेरिकेची नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (NASA) यांच्यातील ऐतिहासिक सहकार्याचे प्रतीक असलेली ‘NISAR’ मोहीम उद्या 30 जुलै रोजी श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित होणार आहे. सतीश धवन अंतराळ केंद्रातून GSLV-F16 रॉकेटद्वारे या उपग्रहाचे प्रक्षेपण होणार आहे. जगातील सर्वात प्रगत रडार इमेजिंग उपग्रहाचे हे पहिले उड्डाण ठरणार आहे.
NISAR म्हणजे काय?
‘NISAR’ म्हणजे NASA-ISRO Synthetic Aperture Radar. ही एक अत्याधुनिक रडार इमेजिंग मोहीम असून पृथ्वीच्या पृष्ठभागावरील बदल, नैसर्गिक आपत्ती, पर्यावरणीय घडामोडी आणि हवामान बदलाचे सखोल निरीक्षण करणे हा तिचा मुख्य उद्देश आहे. या मोहिमेद्वारे दर 12 दिवसांनी पृथ्वीचा सखोल नकाशा तयार केला जाईल. जमिनीतील ओलावा, वनस्पती वाढ, बर्फ वितळणे आणि समुद्रपातळीतील बदल यावर लक्ष ठेवले जाईल. तसेच या उपग्रहामुळे भूकंप, त्सुनामी, ज्वालामुखी, भूस्खलन यांसारख्या आपत्तींची आगाऊ माहिती मिळवण्यास मदत होईल. याशिवाय, शहरीकरण, जंगलतोड, तेलगळती यांसारख्या मानवनिर्मित बदलांचे निरीक्षण केले जाईल.
निसार मोहिमेमुळे भारताची जागतिक पातळीवरील वैज्ञानिक प्रतिमा बळकट होणार आहे. या मोहिमेचा डेटा जगभरातील संशोधकांना मोफत उपलब्ध करून दिला जाणार असून, संशोधन, आपत्ती व्यवस्थापन आणि पर्यावरणीय धोरणांसाठी ती अमूल्य ठरणार आहे.
सर्वात महाग अर्थ इमेजिंग उपग्रह
'NISAR' उपग्रहाचा खर्च सुमारे 1.5 अब्ज डॉलर्स (सुमारे 13,000 कोटी रुपये) इतका आहे. यात NASA ने एल-बँड रडार, GPS रिसीव्हर, कम्युनिकेशन यंत्रणा आणि सॉलिड स्टेट डेटा रेकॉर्डर दिले आहेत. ISRO ने या उपग्रहाची प्रक्षेपण सेवा आणि सॅटेलाइट सपोर्ट सिस्टीम तयार केली आहे. या उपग्रहाचे वजन सुमारे 2392 ते 2800 किलोग्रॅम आहे.
हेही वाचा - भारत ठरला पारंपारिक उपचार पद्धतींची एआय लायब्ररी तयार करणारा जगातला पहिला देश
निसार उपग्रहाची वैशिष्ट्ये -
निसार उपग्रहात दुहेरी रडार प्रणाली आहे. नासाचा एल-बँड रडार पृथ्वीच्या खोल पृष्ठभागाचा अभ्यास करेल आणि इस्रोचा एस-बँड रडार पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या संरचनांचा अभ्यास करेल. तसेच यातील अँटेना उच्च रिझोल्यूशन इमेजिंगसाठी आहे, जो 240 किलोमीटर अंतरापर्यंतचे चित्र काढू शकतो. उपग्रहाचा डेटा साधारणपणे 2 दिवसांत सार्वजनिक होईल, परंतु आपत्कालीन परिस्थितीत तो काही तासांत उपलब्ध होईल. याशिवाय, उपग्रह दर 6 दिवसांनी नवीन नमुने घेऊन अद्ययावत माहिती देखील प्रदान करेल.
हेही वाचा - एलोन मस्क पुन्हा लाँच करणार व्हाइन अॅप; काय असेल खास? जाणून घ्या
पृथ्वीवरील बदलांचे निरीक्षण -
इस्रो आणि नासाची ‘NISAR’ मोहीम केवळ एक अंतराळ मोहिम नाही, तर पृथ्वीवरील भविष्याच्या सुरक्षिततेचा महत्त्वाचा टप्पा आहे. पृथ्वीवरील बदलांचे नेमके आणि वेळेत निरीक्षण करून मानवी जीवनावर होणारे परिणाम कमी करणे, हे या मोहिमेचे अंतिम ध्येय आहे. हा उपग्रह भारतीय अंतराळ विज्ञानाच्या इतिहासातील एक ऐतिहासिक पर्व ठरणार आहे.