Jaideep Ahlawat: छोट्या गावातून आलेला आणि आज हिंदी सिनेसृष्टीत आपलं वेगळं स्थान निर्माण केलेला अभिनेता म्हणजे जयदीप अहलावत. अभिनयातील सहजता, प्रभावी संवादफेक आणि भूमिकेची खोल समज यामुळे त्याने प्रेक्षकांच्या मनात आपली छाप सोडली आहे. मात्र अभिनयाबरोबरच त्याच्या फिटनेसबद्दल आणि खाण्याच्या सवयींबद्दलही त्याने अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत दिलखुलासपणे सांगितलं.
‘खाने में क्या है’ या यूट्यूब शोमध्ये कुणाल विजयकरशी संवाद साधताना जयदीपनं आपल्या बालपणातील आहार आणि जीवनशैलीबद्दल सांगितलं. त्याच्या या मुलाखतीतून समोर आलं की, जयदीप लहानपणी दिवसाला तब्बल 40 रोट्या आणि सुमारे दीड लिटर दूध पित असे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एवढं खात असूनही त्याचं वजन मात्र कधीच 70 किलोच्या पुढे गेलं नव्हतं.
हरियाणातील गावात वाढलेल्या जयदीपचा दिवस शारीरिक मेहनतीत जात असे. शेतात काम करणं, हंगामी फळं आणि भाज्या तोडून खाणं, यामुळे त्याचं शरीर सदैव सक्रिय राहत असे. त्यामुळे कितीही खाल्लं तरी त्याचं सर्व काही संतुलित राहत होतं. जयदीपनं सांगितलं की, 'मी रोज सकाळी चणे, बाजरीची रोटी किंवा मिस्सी रोटी खायचो, त्यासोबत लस्सी, घरचं बटर आणि चटणी असायची. दुपारचं आणि रात्रीचं जेवण तयार असायचं, पण आमचं वेळापत्रक इतकं ठरलेलं होतं की भूक लागली म्हणून काही खायचं असा प्रकार नव्हता.'
हेही वाचा: Do Not Peel Soaked Almonds: भिजवलेले बदाम सोलून खाताय? जाणून घ्या पोषणतज्ज्ञांचा सल्ला
दूध हा त्याच्या आहाराचा अविभाज्य भाग होता. तो दिवसातून तीन वेळा अर्धा लिटर दूध पित असे. आणि गंमत म्हणजे ते दूध तो ग्लासमध्ये नाही, तर तांब्यात प्यायचा हे त्यांच्या घरी नेहमीचं होतं. गावातल्या संस्कृतीचा आणि शिस्तबद्ध जीवनशैलीचा हा भाग असल्याचं त्याने नमूद केलं.
जयदीपनं आपल्या शरीराच्या गरजेनुसार खाणं आणि मेहनत करणं, हेच फिटनेसचं खरं रहस्य असल्याचं सांगितलं. अभिनय क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी शरीर फिट असणं किती गरजेचं आहे, हे तो कायम मानत आला आहे. त्यामुळे तो आजही आपल्या खाण्यापिण्यावर आणि व्यायामावर तितकंच लक्ष देतो.
सध्याच्या जमान्यात जिथे फिटनेससाठी डाएट प्लॅन्स आणि प्रोटीन सप्लिमेंट्सवर भर दिला जातो, तिथे जयदीपची ही नैसर्गिक जीवनशैली आणि साध्या खाण्याच्या सवयी निश्चितच प्रेरणादायी वाटतात. कारण शेवटी शरीराचं आरोग्य आणि फिटनेस हा बाहेरून आणलेल्या गोष्टींवर नाही, तर आपल्या जीवनशैलीवर अवलंबून असतो; हे जयदीपच्या उदाहरणावरून पुन्हा एकदा सिद्ध होतं.