Sunday, August 31, 2025 08:12:18 PM

माकडा माकडा हुप.. वाघाला बसवलं चूप! पाहा माकडाची शिकार करायला गेलेल्या वाघाची फजिती, पाहा VIDEO

वाघ माकडाचा पाठलाग करत थेट त्याच्यावर उडी घेण्याचा प्रयत्न करतो. धूर्त माकड झाडाची मजबूत खोडं सोडून एका पातळ फांदीला लटकतं. पण, वाघाला झाडावर उड्या मारण काही जमत नाही.

माकडा माकडा हुप वाघाला बसवलं चूप पाहा माकडाची शिकार करायला गेलेल्या वाघाची फजिती पाहा video

Tiger Hunting Video Viral: वाघ हा किती धोकादायक शिकारी प्राणी आहे, आपल्या सर्वांनाच माहीत आहे. वाघ आपल्या एका डरकाळीने जंगल दणाणून सोडतो. त्याच्या एका उडीत आणि एका फटक्यात शिकार गारद होते. माकडे आणि गवत खाणारे प्राणी हे जंगलात वाघाचे भक्ष्य बनणारे प्राणी आहेत. अशाच माकडाची शिकार करू पाहणाऱ्या वाघाचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे. यात शेवटच्या श्वासापर्यंत हिंमत न सोडणाऱ्या माकडाची युक्ती आणि शेवटी होणारी वाघाची फजिती व्हिडिओत पाहायला मिळते.

समोर काळ 'आ' वासून उभा असताना त्याच्याशी दोन हात करणारे माकड पंचतंत्रातल्या गोष्टीतल्या सशाची आठवण करून देते. 'सिंहाला रडवीन ढसाढसा' म्हणणाऱ्या गोष्टीतल्या सशासारखंच धैर्य इथे माकडानंही दाखवलं. माकड झाडावर बसलं होतं. त्याची शिकार करायला वाघही झाडावर चढला होता. (मांजर कुळातल्या वाघ, चित्ता, बिबट्या या प्राण्यांना झाडावर चढता येतं बरं..) आता कोणत्याही क्षणी तो माकडावर झडप घालणार आणि माकड त्याच्या आक्राळविक्राळ जबड्यात सापडणार अशीच स्थिती होती. या क्षणी व्हिडिओ पाहणाऱ्यांचा श्वास आपोआप रोखला जातो. पण वाघासाठीही परिस्थिती सोपी नव्हती.

हेही वाचा - पुण्यात रिक्षाचालकांची गुंडगिरी! नागरिकांना रोजचा फुकटचा त्रास; पोलीस अद्याप गप्पच

झाडाच्या फांद्या बारीक-बारीक होत्या. त्यांचं जाळं तयार झालं होतं. त्यावर स्वतःच्या अजस्र शरीराचा तोल सावरणं वाघासाठीही कठीण होतं. वाघ आणि माकड दोघेही एकमेकांचा अंदाज घेत होते. तेवढ्यात वाघाने वाट बघणं संपवत निकराने माकडाच्या दिशेने झेप घेतली. माकड पटकन जिवाच्या कराराने एका उडीत वाघाच्या खालून त्याच्या शेपटीकडच्या फांदीवर पोहोचलं. यामुळे वाघाचा नेम चुकला आणि तोलही गेला आणि फांद्याच्या जंजाळात अडकलेला वाघ कसातरी धडपडत खाली पडला. माकडाची युक्ती आणि खाली पडणाऱ्या वाघाची त्रेधातिरपीट उडालेली पाहताना हसू आल्याशिवाय राहणार नाही. तसंच, व्हिडिओ तीन-चार वेळा पाहिल्याशिवाय समाधान होणार नाही.

तर, जिम कॉर्बेट या उद्यानातील हा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. thebigcatsempire नावाच्या वापरकर्त्याने सोशल मीडिया इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ जुना असल्याचे सांगण्यात येत आहे. वाघाला धडा शिकवण्यासाठी माकडानं लढवलेली शक्कल पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
व्हिडीओला आतापर्यंत अनेक लोकांनी पाहिले असून अनेकांनी कमेंट्स करत यावर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “मला माहीत नव्हते की वाघ झाडांवर चढू शकतात?” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “खाली पडल्यानंतर वाघाला वाटले असेल, अरे देवा, हे कोणीही पाहिले नसावे.” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “प्रत्येकाचा स्वतःचा प्रदेश असतो, वाघाने त्याचा गर्व सोडला पाहिजे.”

हेही वाचा - तोलामोलाचं स्थळ हवं! 500 कोटींच्या मार्केट कॅपवाल्या वधूंसाठी मारवाडी-गुजराती वर पाहिजे! लग्नासाठी धमाकेदार जाहिरात


सम्बन्धित सामग्री