Wednesday, August 20, 2025 05:20:28 PM

Margashirsha Guruvar 2024: मार्गशीर्ष गुरुवारी कशी करावी पूजा; संपूर्ण विधीनुसार सर्व जाणून घ्या

Margashirsha Guruvar 2024: देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने आणि सुख-समृद्धीसाठी बहुतेक विवाहित स्त्रिया मार्गशीर्ष गुरुवारी उपवास करतात.यादिवशी स्त्रिया मनोभावे आणि विधीपूर्वक देवी लक्ष्मीची पूजा करतात.

margashirsha guruvar 2024 मार्गशीर्ष गुरुवारी कशी करावी पूजा संपूर्ण विधीनुसार सर्व जाणून घ्या 
margashirsha guruvar
margashirsha guruvar

प्राची ढोले, मुंबई : हिंदू धर्मात अनेक सण-उत्सव साजरे केले जातात. आता मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी व्रत करण्याची परंपरा आहे. मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत केले जाते. गुरुवारी सुवासिनी महिला मनोभावे हे व्रत करतात. देवी लक्ष्मीची पूजा करून रात्री गोड-धोड नैवेद्य देवीला अर्पण केला जातो. बऱ्याच ठिकाणी या व्रताच्या निमित्ताने स्त्रियांना हळदी कुंकू लावून वाण दिले जाते. लहान-थोरांना यानिमित्त गोड पदार्थ खायला मिळतात.

मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या व्रताला काही लोक महालक्ष्मी व्रत असेही म्हणतात. मात्र या व्रताचे महत्व काय आहे आणि त्याची पूजा पद्धती काय आहे, याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत. 

मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी कशी करावी पूजा -

गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करून तयार व्हावे. सुवासिनी या दिवशी उपवास करतात. सर्वप्रथम चौरंग किंवा पाट मांडावा. त्या पाटावर स्वच्छ कापड अंथरावे. त्यानंतर एक पाण्याचा कलश घ्या. त्यात सुपारी, दूर्वा आणि नाणे टाकावे. कलशासाठी आंब्याची किंवा अशोकाची पाच ते सात पाने वापरावी. या पानांमध्ये नारळ ठेऊन कलश तयार करावा. त्यानंतर कलशावर हळद-कुंकु लावावे. पाटाभोवती सुंदर रांगोळी काढावी.

आता पाटावर तांदळाची रस ठेवा आणि त्यावर तयार केलेला कलश ठेवा. कलशाची पूजा त्याला फुले आणि अक्षता अर्पण करा. कलशावर ठेवलेल्या नारळाला फुले आणि अक्षता अर्पण करा. यानंतर पाटावर देवी लक्ष्मीची मूर्ती स्थापित करा. देवीच्या मूर्तीला हळद-कुंकू लावा आणि फुलांनी सजवा. नंतर देवीसमोर गोडाचा प्रसाद, मिठाई, खीर आणि फळे अर्पणकरा. दिवा लावून लक्ष्मी मातेचे ध्यान करा आणि वैभव लक्ष्मीच्या व्रताची कथा वाचा किंवा ऐका. जमल्यास महालक्ष्मी नमन अष्टक पठण करा आणि शेवटी आरती करा.

मार्गशीर्ष गुरुवारचे महत्त्व -

देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने आणि सुख-समृद्धीसाठी बहुतेक विवाहित स्त्रिया मार्गशीर्ष गुरुवारी उपवास करतात.यादिवशी स्त्रिया मनोभावे आणि विधीपूर्वक देवी लक्ष्मीची पूजा करतात. महालक्ष्मीला संपत्ती आणि ऐश्वर्याची देवी मानली जाते. जेव्हा देवी लक्ष्मी भक्तांवर प्रसन्न होते तेव्हा ती त्यांचे जीवन सुख आणि समृद्धीने भरते, अशीही मान्यता आहे. मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी या व्रताची सांगता केली जाते. 

मार्गशीर्ष महिन्यात किती गुरुवार आहेत -

–  05 डिसेंबर 2024
– 12 डिसेंबर 2024
– 19 डिसेंबर 2024
– 26 डिसेंबर 2024
– 04 जानेवारी 2025
– 11 जानेवारी 2025

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)


सम्बन्धित सामग्री