Nag Panchami 2025: हिंदू धर्मात नागांची एक विशिष्ट जागा आहे. श्रावण शुद्ध पंचमीला ‘नागपंचमी’ साजरी केली जाते. या दिवशी नागदेवतांची पूजा केली जाते आणि भगवान शिवालाही या दिवशी विशेष महत्त्व दिले जाते. जनमानसात असे मानले जाते की या दिवशी सर्पपूजा केल्याने सर्पदोष, भय आणि अपशकुनापासून मुक्ती मिळते.
मात्र या धार्मिक श्रद्धांमध्ये एक प्राचीन पण जीवघेणी प्रथा आजही चालू आहे. ती म्हणजे नागाला दूध पाजणे. अनेक शिवमंदिरांबाहेर सपेरे आपल्या पिंजऱ्यात बंद केलेले साप घेऊन बसतात आणि भक्त त्यांना दूध पाजण्याचा प्रयत्न करतात. लोक असे समजतात की या कृतीमुळे पुण्य मिळते, समृद्धी येते आणि शिवशंकर प्रसन्न होतात.
पण वैज्ञानिक दृष्टिकोन काय सांगतो?
साप हे स्तनपायी प्राणी नाहीत, म्हणजेच त्यांचं पचनतंत्र दूध पचवण्यासाठी बनलेलं नाही. दूध प्यायल्यामुळे त्यांच्या पचनसंस्थेला मोठा त्रास होतो. काही वेळा तर दूध पिऊन ते आजारी पडतात, उलट्या करतात किंवा मृत्युमुखीही पडतात.
याशिवाय, सपेरे हे सापांना महिनोंमहिने उपाशी ठेवतात, त्यांचे विषदंत (fangs) काढून टाकतात, विषग्रंथी काढून टाकतात आणि काही वेळा त्यांच्या तोंडाला धागा बांधून त्यांना काहीही खाता-पिता येऊ देत नाहीत. या अवस्थेत साप इतके दुर्बल होतात की काही थेंब दूधही पिण्यास भाग पडतात.या प्रकाराने सापांची प्रचंड शारीरिक आणि मानसिक पिळवणूक होते. उत्सव संपल्यानंतर काही दिवसांत हे साप मरून जातात.
हेही वाचा:Nag Panchami 2025: धन, सौभाग्य आणि संकटमुक्तीसाठी नाग पंचमीला दान करा 'या' वस्तू
नैसर्गिक आणि धार्मिक दृष्टीने आपण काय शिकायला हवे?
आपल्या धर्मात निसर्गाचे आणि प्राण्यांचे रक्षण करण्यावर भर दिला जातो. भगवान शंकरांच्या गळ्यात नाग विराजमान आहेत, त्यांना स्नान घालण्यासाठी दूध, पाणी, पंचामृत वापरण्यात येते. याच संदर्भातून कदाचित नागदेवतांनाही दूध पाजण्याची कल्पना रुजली असेल. पण काळ बदलला आहे आणि आज विज्ञान आपल्याला या प्रथांच्या परिणामांची जाणीव करून देतो आहे.
सर्पमित्रांचं आवाहन
सर्पमित्र आणि प्राणीसंवर्धन करणारे कार्यकर्ते अनेक वर्षांपासून नागपंचमीच्या दिवशी या प्रथेविरोधात जनजागृती करत आहेत. ते सांगतात की सापांचे विषदंत तोडणे, त्यांचे तोंड शिवणे किंवा त्यांना उपाशी ठेवणे हे सर्व प्रकार अमानवी आणि गुन्हेगारी स्वरूपाचे आहेत.त्यामुळे नागपंचमीच्या निमित्ताने आपण सर्पपूजा जरूर करावी, पण प्रत्यक्ष सापांना त्रास देणे, त्यांना बंदिस्त करणे किंवा दूध पाजणे टाळावे. त्याऐवजी, नागदेवतांची प्रतिमा, चित्र, मुर्ती वा पूजनसाहित्य याच्या माध्यमातून पूजा करता येऊ शकते.
हेही वाचा:Nag Panchami 2025: नागपंचमीची पूजा कशी करतात, चुकूनही 'या' गोष्टी करु नये
नागपंचमी म्हणजे केवळ श्रद्धा आणि पारंपरिक पूजनाचा दिवस नाही, तर निसर्ग आणि जैवविविधतेच्या रक्षणाचा संदेश देणारा पवित्र दिवस आहे. त्यामुळे या दिवशी श्रद्धेपेक्षा अधिक महत्त्व सहानुभूतीला देणे गरजेचे आहे. जर आपण खरचं पुण्य कमावायचं असेल, तर कोणत्याही जीवाला त्रास न देता, त्याच्या नैसर्गिक अस्तित्वाचा आदर करत पूजा करणे हेच योग्य.
नागपंचमीला सर्पांना दूध पाजण्याची प्रथा हानिकारक आहे. श्रद्धा ठेवूनही विज्ञानाचं भान ठेवावं. सर्पदोष टळावा म्हणून सापांना त्रास न देता पूजन करण्याचा संदेश या दिवशी द्यावा.