Nepal Jail Break : नेपाळमध्ये सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान (Gen Z Protest) विविध तुरुंगांमधून 13,572 हून अधिक कैदी पळून गेले आहेत. हिंसाचार आणि अराजकतेमुळे पोलीस दल कमकुवत झाले होते, ज्याचा फायदा कैद्यांनी घेतला आहे.
सोमवारपासून सुरू झालेला Gen Z निदर्शकांचा निषेध मंगळवारीही सुरूच राहिला. नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी राजीनामा दिला असला तरी, देशातील परिस्थिती अजूनही निवळलेली नाही. नेपाळच्या तुरुंगात बंदिवानांनीही या अराजकतेचा फायदा घेतला आहे. देशातील विविध तुरुंगांमधून 13 हजारांहून अधिक कैदी पळून गेले आहेत.
देशभरातील तुरुंगांमध्ये सुमारे 30 हजार कैदी होते. हिंसाचार वाढल्यानंतर आणि सरकार कोसळल्यानंतर पोलिसांनीही त्यांच्या कर्तव्यावरून माघार घेतली. दरम्यान, निदर्शकांनी पोलीस स्टेशन आणि सरकारी कार्यालयांची तोडफोड करण्यास सुरुवात केली. याचा फायदा घेत कैदीही तुरुंगातून पळून गेले. याशिवाय, पोलीस स्टेशनमधून पोलिसांची शस्त्रेही चोरीला गेली आहेत.
यातील अनेक तुरुंग भारतीय सीमेजवळ आहेत. यामुळे भारतातही चिंता वाढली आहे. कारण हे पळून गेलेले कैदी देशाची सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करू शकतात. जरी भारतीय सैन्याने नेपाळ सीमेवर लक्ष ठेवले असले तरी, नेपाळ आंदोलनाचा फटका भारतालाही बसू शकतो.
हेही वाचा - Nepal PM : सुशीला कार्की यांच्यासह चार जणांची नावं चर्चेत, नेपाळच्या पंतप्रधानपदी कोणाची वर्णी ?
कोणत्या तुरुंगातून किती कैदी पळून गेले?
नेपाळच्या गृह मंत्रालय आणि नेपाळ पोलिसांच्या सूत्रांनुसार, देशातील वेगवेगळ्या तुरुंगातून 13,572 कैदी पळून गेले आहेत.
झुंपका तुरुंग - 1575 कैदी
नक्कू तुरुंग 1200 कैदी
दिल्ली बाजार तुरुंग 1100 कैदी
कास्की तुरुंग 773 कैदी
चितवन तुरुंग - 700 कैदी
कैलाली तुरुंग - 612 कैदी
जलेश्वर तुरुंग - 576 कैदी
नवलपरासी तुरुंग - 500 हून अधिक कैदी
सिंधुलीगढी तुरुंग - 471 कैदी
कांचनपूर तुरुंग - 450 कैदी
गौर तुरुंग - 260 कैदी
डांग तुरुंग - 124 कैदी
सोलुखुंबू तुरुंग - 86 कैदी
बझांग तुरुंग - 65 कैदी
जुमला तुरुंग - 36 कैदी
इतक्या कैद्यांनी पलायन केले आहेत. इतर तुरुंगातून आणि पोलीस कोठडीत असलेले कैदीही पळून गेले आहेत. त्यामुळे पळून गेलेल्या कैद्यांची संख्या 13,572 झाली आहे.
हेही वाचा - Gen-Z Meaning: जनरेशन Z म्हणजे कोण? कोणत्या वयोगटातील लोक या पिढीत येतात? जाणून घ्या संपूर्ण माहिती
नेपाळमध्ये लष्करी राजवट
ओली यांच्या राजीनाम्यानंतर नेपाळमध्ये लष्करी राजवट लागू करण्यात आली आहे. लष्करप्रमुख अशोक राज यांनी निदर्शकांना परत येऊन चर्चा करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, अंतरिम सरकार स्थापनेबाबतही चर्चा तीव्र झाली आहे, ज्यासाठी काठमांडूचे बालेंद्र शाह आणि सुशीला कार्की यांच्या नावांचा विचार केला जात आहे.