Wednesday, August 20, 2025 09:18:40 AM

Shrawan Somvar : दुसऱ्या श्रावण सोमवारी महादेवाला अर्पण करा 'तिळाची शिवामूठ'; घरीही करा अशी पूजा

श्रावणातील सोमवार भगवान शंकराला अत्यंत प्रिय मानला जातो. या दिवशी भाविक मोठ्या संख्येने महादेवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतात आणि पूजन करून आशीर्वाद प्राप्त करतात.

shrawan somvar  दुसऱ्या श्रावण सोमवारी महादेवाला अर्पण करा तिळाची शिवामूठ घरीही करा अशी पूजा

Shravan 2025: श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार आज 4 ऑगस्ट रोजी आहे. श्रावणातील सोमवार भगवान शंकराला अत्यंत प्रिय मानला जातो. श्रावणातील प्रत्येक सोमवारी सर्वत्र भक्तीमय वातावरण पाहायला मिळतं. महादेवाच्या मंदिरात मोठी गर्दी जमते. या दिवशी शंकराची मनोभावे पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. नवविवाहितांनी लग्नानंतरची पहिली पाच वर्षे महादेवाला श्रावणात शिवामूठ वाहण्याची पवित्र परंपरा आहे. दुसऱ्या श्रावण सोमवारी तिळाची शिवामूठ वाहिली जाते.

दुसऱ्या सोमवारी तिळाची शिवामूठ (shivamuth) वाहावी
आजची तारीख : 04-08-2025 सोमवार
आजची तिथी : श्रावण
आजचे नक्षत्र : अनुराधा
अमृतकाळ : 14:19 to 15:56
राहूकाळ : 07:50 to 09:27
सूर्योदय : 06:13:00 सकाळी
सूर्यास्त : 07:10:00 सायंकाळी

दुसरा श्रावणी सोमवार : 04 ऑगस्ट 2025 रोजी दुसऱ्या सोमवारी महादेवाला 'तिळाची' शिवामूठ वाहावी.

हेही वाचा - Gajkesari Rajyog : जन्मकुंडलीत असा तयार होतो गजकेसरी राजयोग! जीवनात मिळतो खूप आदर आणि संपन्नता

शिवामूठ अर्पण करण्याची पद्धत (Shivamuth): विवाहानंतर पहिली पाच वर्षे श्रावण सोमवारी शिवामूठ व्रत केलं जातं. तसेच, इतरही सर्वजण करू शकतात. मात्र, लग्नानंतरची पाच वर्षे हे पूजन करण्याला विशेष महत्त्व आहे. श्रावण मासात येणार्‍या चार सोमवारी चार प्रकारचे धान्य शिवाला अर्पण केले जाते. विवाहानंतरची पहिली पाच वर्षे क्रमवार हे व्रत केले जाते. श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी एकभुक्त (दिवसभरात एकदाच खाणे) राहून शिवलिंगाची पूजा करावी आणि क्रमाने प्रत्येक सोमवारी तांदूळ, तीळ, मूग, जव आणि सातू (पाचवा सोमवार आल्यास त्या दिवशी) यापैकी एकेका धान्याच्या अशा एकूण पाच मुठी भगवान शिवाला वाहाव्या.

'या' पद्धतीनं घरी करा महादेवाची पूजा

सोमवारी सकाळी स्नान करून उपवास करून महादेवाची पूजा करावी. शिव मंदिरात जावं किंवा घरातील शिवलिंगाची पूजा करावी. महादेवाला उपलब्ध असल्यास गंगाजल किंवा दुधानं अभिषेक करावा किंवा शिवलिंगाला पाण्याने स्वच्छ धुऊन त्यावर पंचामृताने अभिषेक करावा. अभिषेक करताना 'ॐ नमः शिवाय' या मंत्राचा किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करत राहावे. अभिषेक झाल्यावर शिवलिंग पुन्हा शुद्ध पाण्याने स्वच्छ करावे. यानंतर शिवलिंगाला स्वच्छ पुसून चंदन, अष्टगंध, बेलपत्र, शमीपत्र, अक्षता, पांढरी फुलं, मध, फळं, साखर, अगरबत्ती अर्पण करावी आणि सोमवारची कथा वाचावी. (बेलपत्र वाहताना त्याचा देठ आपल्याकडे असावा. कारण बेलपत्र हे दोन हात आणि मस्तक यांचे प्रतीक मानले जाते. तेव्हा आपण देवासमोर दोन हात टेकवून मस्तक त्याच्या चरणांवर ठेवून स्वतःला अर्पण करतो, अशी भावना यामागे आहे.) शिवलिंगासमोर तुपाचा दिवा लावून आरती करावी. तर प्रत्येक सोमवारी भगवान महादेवाला शिवामूठ नक्की अर्पण करावी. महादेवाला आवडणाऱ्या वस्तू, जसे की रुद्राक्ष किंवा नाग या मूर्तीही अर्पण करू शकता.

जप आणि प्रार्थना
पूजा झाल्यावर काही वेळ शांत बसून 'ॐ नमः शिवाय' या मंत्राचा 108 वेळा जप करावा. आपल्या मनातील इच्छा आणि अडचणी महादेवाला सांगाव्यात. उपवास केला असेल, तर पूजा झाल्यानंतर तो उपवास सोडू शकता किंवा संध्याकाळी प्रदोष काळात पूजा करून उपवास सोडावा. या पद्धतीनं पूजा केल्यास भगवान शिव नक्कीच तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर कृपा करतील.

हेही वाचा - Raksha Bandhan 2025 : रक्षाबंधनावेळी अशी चूक करू नका; नाहीतर, बहीण-भावाच्या नात्यात पडू शकते दरी

(Disclaimer : ही बातमी धार्मिक श्रद्धेवर आणि मान्यतेवर आधारित आहे. जय महाराष्ट्र याची हमी देत नाही.)


सम्बन्धित सामग्री